चिंचवड : डोळ्यावर पट्टी बांधून पुस्तक वाचन, पेंटिंग, स्केटिंग व हावभाव ओळखण्याचे कौशल्य सरस्वती साधनेच्या माध्यमातून शक्य असल्याचे प्रांजल पंकज बरडिया (वय ८) हिने दाखवून दिले आहे. आकुर्डीत चातुर्मास काळात जैन साध्वी नवकार आराधिका प्रतिभाजी म.सा. यांच्या प्रेरणेतून आयंबिल आराधिका प्रफुल्लाजी म. सा. यांनी १२० विद्यार्थ्यांना सरस्वती साधनेतून मिडब्रेन अॅक्टिव्हेशन केले. या साधनेतून डोळ्यावर पट्टी बांधून सर्व काही करता येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.डोळ्यात काळाकुट्ट अंधार दाटलेला असतानाही मुलांना सहजपणे रंग ओळख, वाचन, पेंटिंग व स्केटिंगसारखे प्रकार सहज करता येत आहेत. प्रांजल हिने चार महिने सतत साधना करीत स्वत:ला सिद्ध केले आहे. स्पर्शज्ञान, आवाज व सुगंधाच्या माध्यमातून आपल्याला या सर्व गोष्टी करता येत असल्याचे तिने सांगितले.प्रांजल पाचवीत शिकत आहे. सुरुवातीला सरस्वती साधनेतून हे करता येईल यावर विद्यार्थ्यांना विश्वास बसत नव्हता. मात्र प्रफुल्लाजी म. सा. यांनी ध्यान व साधनेच्या माध्यमातून हे शक्य असल्याचे दाखवून दिले आहे. मुलांच्या बौद्धिक विकासात या साधनेमुळे मोठा बदल झाल्याचे प्रांजलची आई योगिता यांनी सांगितले. मुलीच्या स्मरणशक्तीत फरक पडला असून, अभ्यासात एकाग्रता आल्याचे त्यांनी सांगितले. या साधनेमुळे मुलांच्या वागण्यात व बोलण्यातही बदल झाल्याचे पालक सांगत आहेत.शिबिरात गौरव बाफना, तिलोक दुगड, सुजल ओसवाल, कुशल कांकरिया, संयमी बलदोटा, विधी बडेरा, सिद्धी बोरा, अस्मि सेठिया या मुलांनीही सरस्वती साधनेच्या माध्यमातून मिडब्रेन अॅक्टिव्हेशन केले आहे. या पुढील काळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्मिता संतोष मुथा व योगिता पंकज बरडिया यांना जैन साध्वींनी प्रशिक्षण दिले आहे. गांधी पेठेतील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या स्थानकात विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर सुरू करण्यात आले आहे.
डोळ्यांवर पट्टी बांधून प्रांजल करते वाचन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 3:08 AM