सर्रास पेटविला जातोय कचरा, उपाययोजना करण्याबाबत महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 03:23 AM2018-03-06T03:23:52+5:302018-03-06T03:23:52+5:30
प्रदूषणाचा मुद्दा गंभीर असताना याबाबत महापालिका प्रशासन आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिक उदासीन असल्याचे दिसून येते. शहरात ठिकठिकाणी कचरा पडल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी कचरा पेटविण्याचे प्रकार सर्रास होत आहेत.
तळवडे - प्रदूषणाचा मुद्दा गंभीर असताना याबाबत महापालिका प्रशासन आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिक उदासीन असल्याचे दिसून येते. शहरात ठिकठिकाणी कचरा पडल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी कचरा पेटविण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. त्यामुळे शहरातील प्रदूषणात वाढ होत आहे. महापालिका प्रशासनाने यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
आपले शहर, स्वच्छ शहर, सुंदर शहर हा नारा देत पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मोबाइल फोनवर ‘स्वच्छ भारत का इरादा कर लिया हम ने’ अशा स्वरूपाच्या रिंगटोनही वाजू लागल्या आहेत.
महापालिकेने शहर परिसरात ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवल्या आहेत. कचरा गोळा करणाºया घंटागाड्या कचरा गोळा करीत आहेत. परंतु तरीही बहुतांश ठिकाणी कच-याचे ढीग दिसत आहेत. कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत. ओला व सुका असे कचºयाचे विलगीकरण, तर केवळ कागदावरच उरले आहे.
कित्येक ठिकाणी साचलेला कचरा उचलला जात नसल्यामुळे नागरिक तो कचरा त्याच ठिकाणी पेटवून देत आहेत. यामुळे शहरात प्रदूषण वाढत आहे.
कोणतीही योजना यशस्वी होण्यासाठी नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद व सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे. स्वच्छ शहर, सुंदर शहर करायचे असेल व स्मार्ट सिटी करायची असेल, तर नागरिकांनी स्मार्ट व्हायला हवे. नाही तर चांगल्या योजनाही अपयशी होतात, याचा पिंपरी-चिंचवड शहरात वेळोवेळी प्रत्यय आला आहे.
एमआयडीसी भागातही वाढले प्रकार
शहर परिसरात कचरा पेटविण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. असे असतानाही महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. शहरापाठोपाठ एमआयडीसीतही कचरा पेटविण्याचे प्रकार वाढले आहे. अनेक लहान-मोठ्या कंपन्यांच्या बाहेर कचरा पेटविल्याचे दिसून येते. यात कंपन्यांतील टाकाऊ वस्तू आदींचा समावेश असतो. यातून मोठ्या प्रमाणात धूर तयार होऊन प्रदूषणात वाढ होत आहे.
कायदेशीर कारवाईची नागरिकांकडून मागणी
कचरा पेटविण्याच्या प्रकारांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. मात्र, याबाबत महापालिका प्रशासन आणि नागरिकांचीही उदासीनता दिसून येते. कचरा पेटविणाºयांवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज
४कचरा पेटविणारे संबंधित यंत्रणेच्या हाती लागत नाहीत. त्यांचा शोध घेणेही सहजशक्य नाही. त्यामुळे कचराकुंडी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहेत. जेणेकरून कचरा पेटविणारे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद होतील आणि त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होईल.
कुंडीतच पेटविला जातो कचरा
शहरात अनेक ठिकाणी कचराकुंड्या ठेवल्या आहेत. दाट वस्तीतील कुड्यांमध्ये कचरा टाकण्याचे मोठे प्रमाण असते. त्यामुळे बहुतांश कचराकुंड्या एका दिवसातच ओसंडून वाहत असतात. अशा कुंडीतच कचरा पेटवून देण्याचे प्रकार वाढले आहेत. याला आळा बसणे आवश्यक आहे.
कचरा विलगीकरणात येतात अडचणी
कुंडीतील कच-याचे कचरावेचकांकडून विलगीकरण केले जाते. यातील प्लॅस्टिक आदी वस्तू वेगळ्या केल्या जातात. मात्र कुंडीतच कचरा पेटविल्याने कच-याचे विलगीकरण करणे शक्य होत नाही. कचरावेचकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. कचºयासोबत प्लॅस्टिक पेटविल्याने प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते.