कोरोना महासाथीमुळे निर्बंध; गणेशोत्सवासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 10:46 PM2021-09-08T22:46:00+5:302021-09-08T22:47:19+5:30
गणेशोत्सासाठी पोलिसांनीही मोठ्या बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
पिंपरी : कोरोना महासाथीमुळे यंदाच्या गणेशोत्सवावर निर्बंध आहेत. असे असले तरी गणेशभक्तांकडून बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी आहे. गणेशोत्सासाठी पोलिसांनीही मोठ्या बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांकडे कोरोनापूर्वी १८५६ सार्वजनिक मंडळांची नोंद होती. त्याचप्रमाणे नोंद नसलेल्या छोट्या- मोठ्या मंडळांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे शहरात गणेशोत्सवादरम्यान मोठी गर्दी व वर्दळ असते. त्या अनुषंगाने या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासह कोरोना निर्बंधांचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे हे बंदोबस्त देखरेख अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. परिमंडळ एकचे उपायुक्त मंचक इप्पर आणि परिमंडळ दोनचे उपायुक्त आनंद भोईटे यांनीही त्यांच्या हद्दीत बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. पाच सहायक पोलीस आयुक्त, २८ पोलीस निरीक्षक, १०६ उपनिरीक्षक/ सहायक निरीक्षक, ८६२ कमर्चारी, ४०० होमगार्ड आणि एक राज्य राखीव दलाची तुकडी, असा बंदोबस्त उपलब्ध केला आहे.
रस्त्याने विनाकारण फिरणारे रडारवर
नियंत्रण कक्ष येथे राज्य राखीव दलाची एक तुकडी राहणार आहे. वाहतूक पोलीसही तैनात राहणार आहे. कोरोना निर्बंधाचे पालन होते का नाही, याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आयुक्तालय स्तरावरील पाच पथके शहरात फिरणार आहेत. स्थानिक पोलिसांचे एक पथक देखील हद्दीत गस्त घालणार आहे. नियमभंग करणाऱ्या सार्वजनिक मंडळांसह तसेच रस्त्याने विनाकारण फिरत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर या पथकांकडून करवाई होणार आहे.