मंडई आली रस्त्यावर, अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित; विक्रेत्यांची होतेय गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 03:16 AM2018-05-09T03:16:52+5:302018-05-09T03:16:52+5:30
रुपीनगर परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून मंडईचा प्रश्न प्रलंबित आहे. मंडई नसल्यामुळे येथील भाजीविक्रेत्यांना दुकाने रस्त्याच्या कडेला थाटावी लागतात. वाहनचालक, प्रवासी, दुकानदार आणि नागरिक यांची कटकट व ऊन, वारा, पाऊस या सर्व संकटांचा सामना करीत, अतिक्रमणविरोधी कारवाई सहन करीत व्यवसाय करावा लागतो.
तळवडे - रुपीनगर परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून मंडईचा प्रश्न प्रलंबित आहे. मंडई नसल्यामुळे येथील भाजीविक्रेत्यांना दुकाने रस्त्याच्या कडेला थाटावी लागतात. वाहनचालक, प्रवासी, दुकानदार आणि नागरिक यांची कटकट व ऊन, वारा, पाऊस या सर्व संकटांचा सामना करीत, अतिक्रमणविरोधी कारवाई सहन करीत व्यवसाय करावा लागतो. त्यामुळे श्री घारजाई माता फळभाजी मंडई संघटनेच्या वतीने मंडईचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशा मागणीचे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले आहे.
रुपीनगर, सहयोगनगर, त्रिवेणीनगर परिसरात औद्योगिक वसाहतीतील कामगारांचा सुमारे ४० ते ४५ हजार लोकवस्तीचा भाग आहे. या भागात महापालिकेची अधिकृत मंडई नसल्याने संपूर्ण परिसरातील फळ व भाजीविक्रेते मुख्य रस्त्यावरच दुकाने थाटून भाजीविक्री करीत आहेत. तिन्ही ऋतूंमध्ये उभे राहून वारा, पावसाचा सामना करीत कसाबसा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे छोटे-मोटे व्यावसायिक आहेत. नैसर्गिक संकटे तर आहेतच, शिवाय ज्या दुकानासमोर व्यवसाय करतात, त्या दुकानदाराच्या दारात दुकान थाटल्यामुळे भाडेही द्यावे लागते. पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई आणि रहदारीला अडचण होत असल्याची तक्रार करणारे प्रवासी अशा संकटांमुळे येथील फळ व भाजीविक्रेते त्रस्त आहेत. या परिसरात सुमारे १०० पेक्षा जास्त फळ व भाजी विक्रेत्यांनी स्वतंत्र मंडईची मागणी केली आहे. याबाबत संघटनेच्या वतीने अनेक वेळा पालिकेकडे मागणी करूनही त्यावर आजपर्यंत पालिकेकडून कोणतीच उपाययोजना होत नसल्याने गरीब व्यावसायिक सध्या आर्थिक अडचणीत आहेत. येथील मंडईचा प्रश्न सुटणे गरजेचे असल्याची मागणी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब काळोखे यांनी केली आहे.
परिसर रेडझोनच्या हद्दीत येत असल्याने नागरी सुविधा देताना प्रथम
रेडझोनच्या समस्येचा अडथळा येत आहे. तरीही सध्या मंडईची पायाभूत सुविधा द्यावी यासाठी नाल्यावर स्लॅब टाकून किंवा खासगी जागेत
मंडईची उभारणीची उपाययोजना करून हा प्रश्न सोडविण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे दिला आहे. येथील नागरिक व व्यावसायिकांचा लवकरच मंडईचा प्रश्न सुटेल. - पौर्णिमा सोनवणे, नगरसेविका
तात्पुरते पत्राशेड किंवा नाल्यावर स्लॅब टाकून येथील मंडईचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे. कारण या व्यवसायावर कित्येक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. त्याचा महापालिका प्रशासनाने विचार करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. - भाऊसाहेब काळोखे, अध्यक्ष,
श्री घारजाई माता फळभाजी मंडई संघटना, रुपीनगर
मंडईची सोय नसल्यामुळे रस्त्यावर बसून व्यवसाय करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यामुळे रहदारीला अडचण होते. तसेच माल घेताना गिºहाइकाची गैरसोय आणि महापालिकेची कारवाई यामुळे व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे. मंडई झाल्यास स्वतंत्र जागा मिळेल. नियमित व चांगला व्यवसाय करता येईल व रहदारीचाही प्रश्नही सुटेल.
- मंदा अहिरे, भाजीविक्रेता, रुपीनगर
सुसज्ज भाजी मंडई उपलब्ध व्हावी यासाठी अनेक दिवसांपासून मागणी केली जातात. मात्र, अद्यापही भाजी मंडईला मुहूर्त लाभलेला नाही. यामुळे विक्रेत्यांसह ग्राहकांचीही गैरसोय होत आहे. तसेच विक्रेत्यांना रस्त्यावरच मिळेल त्या जागेत माल विक्रीसाठी ठेवावा लागत आहे. तरी लवकरात लवकर भाजीमंडई उपलब्ध करून द्यावी.