सत्ताधारी, प्रशासनात मतभेद, आयोजनावरून भाजपमध्ये पडले दोन गट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:47 AM2017-12-29T01:47:16+5:302017-12-29T01:47:35+5:30
पिंपरी : महापालिकेच्या वतीने दरवर्षी भरविण्यात येणारी पवनाथडी जत्रा यंदा ४ ते ८ जानेवारी या कालावधीत सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात भरविण्यात येणार आहे.
पिंपरी : महापालिकेच्या वतीने दरवर्षी भरविण्यात येणारी पवनाथडी जत्रा यंदा ४ ते ८ जानेवारी या कालावधीत सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात भरविण्यात येणार आहे. जत्रेसाठी महिला व बाल कल्याण समितीतर्फे स्टॉलसाठी ‘लकी ड्रॉ’ही काढण्यात आले. तर, कार्यक्रमपत्रिका छापण्यापासून जत्रेच्या नियोजनाची संपूर्ण तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. भाजपातील एक गट जत्रा व्हावी, अशी मागणी करीत आहे़ तर दुसरा गट खर्चाची बचत करण्यासाठी जत्रा स्थगित करावी, अशी मागणी करीत आहे.
महापालिका नागरवस्ती विभागामार्फत शहरातील महिलांचे आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी पवनाथडी जत्रेचे दरवर्षी आयोजन केले जाते. महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, बचतगटांच्या उत्पादनांची सर्वांना माहिती व्हावी तसेच बचतगटातील महिलांना विक्रीकौशल्ये ज्ञात व्हावीत, याकरिता पवनाथडी जत्रा भरविण्यात येते. या जत्रेत बचत गटांमधील महिलांनी बनविलेल्या वस्तू विक्रीस ठेवण्यात येतात.
सव्वा चारशे स्टॉलसाठी १ हजार अर्ज
यंदा ४ ते ८ जानेवारी या कालावधीत सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात पवनाथडी जत्रा भरविण्यात येणार आहे. जत्रेत सहभाग घेण्यासाठी बचतगटातील महिलांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार, १०१२ अर्ज प्राप्त झाले आहेत. या जत्रेत ४३६ स्टॉलची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या अर्जांवर बुधवारी महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने लकी ड्रॉ काढण्यात आले. याशिवाय कार्यक्रमपत्रिका छापण्यासाठी देण्यात आल्या आहेत. जत्रेच्या कालावधीत आयोजित केले जाणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान, वक्तृत्व स्पर्धा या कार्यक्रमांचीही जय्यत तयारी प्रशासनामार्फत सुरू आहे.
उपक्रमावरील खर्च निरर्थक
महापालिकेतील पदाधिकारी आणि प्रशासकीय स्तरावर अशी जत्रेसाठीची लगबग सुरू असताना भाजपाने एका गटाने पवनाथडी जत्रा हा उपक्रमच स्थगित करण्याची मागणी केली आहे. जत्रेसाठी महापालिकेने ८० लाख रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. कदाचित त्यापेक्षा जास्त खर्च होऊ शकतो. गेली काही वर्षे हा उपक्रम सुरू आहे. मात्र, या उपक्रमातून महिला बचतगटांना विशेष काही साध्य झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या उपक्रमावरील खर्च निरर्थक होणार असल्याने पवनाथडी जत्रा रद्दच करावी, असे आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.