तळवडे : येथील रुपीनगरमध्ये असलेल्या टपाल कार्यालयात नेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे टपाल कार्यालयात पारंपरिक पद्धतीने केवळ पत्र पोहचविण्याची वेळ आली आहे. यामुळे आॅनलाइनच्या जमान्यात पोस्टाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या इतर सुविधांपासून नागरिक वंचित रहावे लागत असल्याचे लोकमत पाहणीतून समोर आले आहे.रुपीनगर, त्रिवेणीनगर, सहयोगनगर, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणेवस्ती, जोतिबानगर आणि तळवडे गावठाण या परिसरातील नागरिक पोस्टल सुविधा मिळण्यासाठी रुपीनगर येथील पोस्ट कार्यालयावर अवलंबून आहेत. परंतु रुपीनगर येथील पोस्टात नेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे पीएलआय, आधार कार्ड तसेच इतर आॅनलाइन कामांसाठी आलेल्या नागरिकांच्या पदरी निराशा पडते.
रुपीनगर येथील पोस्टात कर्मचाºयांची संख्या कमी असल्याचे तसेच नेट कनेक्टिव्हिटी नसल्याची कारणे सांगून या ठिकाणी, स्पीड पोस्ट, मनिआॅर्डर करणे, रजिस्टर करणे, पीएलआयचे हप्ते भरणे यांसारख्या कामांसाठी नागरिकांना दूरवरच्या ठिकाणी असलेल्या टपाल कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे इतर ठिकाणी असलेल्या टपाल कार्यालयावर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. तेथेही नागरिकांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होत असून सुविधांपासून वंचित रहावे लागत असल्याने गैरसोय होत आहे.रुपीनगर आणि परिसरातील नागरिकांना येथील टपाल कार्यालयात स्पीड पोस्ट करणे, आधार कार्ड काढणे, रजिस्टर करणे, मनी आॅर्डरची सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच आॅनलाईन पीएलआयचे हप्ते भरण्याची तसेच टपाल कार्यालयात मिळणाºया सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे. रुपीनगर येथील टपाल कार्यालयात स्पीड पोस्ट आणि पीएलआयचे हप्ते भरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना नेट कनेक्टिव्हीटी नाही. पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून इतरत्र पाठविले जाते. तेथून आकुर्डी परिसरात असलेल्या टपाल कार्यालयात गेल्यास तेथे भल्या मोठ्या रांगा असतात.
चिंचवड येथील टपाल कार्यालयात दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने तेथेही निराशा झाली. मात्र तेथील उपविभाग डाक निरीक्षक परमेश्वर जाधव यांनी जबाबदारी स्वीकारुन नागरिकांना स्पीड पोस्ट करून दिले.