शालेय परिसर तंबाखूमुक्तीचे तीन तेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 05:41 AM2018-03-11T05:41:51+5:302018-03-11T05:41:51+5:30
राज्य सरकारने शैक्षणिक संस्था व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय घेतला असला, तरी शहरातील बहुसंख्य शाळांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सर्रास सुरू आहे. त्यामुळे धुरांच्या रेषा हवेत सोडणाºयांचे प्रमाण वाढत आहे.
भोसरी - राज्य सरकारने शैक्षणिक संस्था व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय घेतला असला, तरी शहरातील बहुसंख्य शाळांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सर्रास सुरू आहे. त्यामुळे धुरांच्या रेषा हवेत सोडणाºयांचे प्रमाण वाढत आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात हे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे. याबाबत पालक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाच्या प्रमाणात वाढ होत आहे. तंबाखूमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी केंद्र सरकारने तंबाखूच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी सिगारेट व तंबाखूजन्य नियंत्रण कायदा २०१३ तयार केला.
याच कायद्याच्या अंमलबजावणीसाठी २०१५ मध्ये राज्य सरकारने शालेय शिक्षण विभागासाठी स्वतंत्र आदेश काढला. या आदेशानुसार परिसरामध्ये तंबाखूविरहित वातावरण तयार करण्याची जबाबदारी शाळांवर टाकण्यात आली आहे. या आदेशानुसार, तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीनुसार शाळेच्या आवारात तंबाखूजन्य
पदार्थाच्या सेवनावर बंदी, सिगारेट फुंकण्यावर बंदी, शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर प्रतिबंध, तंबाखूसेवनाच्या दुष्परिणामांची माहिती देणारे फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शहरातील महापालिकेसह खासगी शालेय परिसराचा फेरफटका मारला असता १०० यार्डांच्या आतील परिसरात सर्रास तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हे, तर व्यसनमुक्तीविषयक जनजागृती, तसेच प्रतिबंधात्मक फलकही या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत. शालेय परिसरात तंबाखू, गुटख्याच्या पुड्या आढळून येतात. तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाºया दुकानांवर विद्यार्थी रेंगाळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
बालकांना आणि बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्री करवून घेण्यावर प्रतिबंध आहे. अशा व्यक्तींवर बालहक्क कायद्यानुसार कारवाई केली जाते. मात्र, शहरातील बहुसंख्य कॅन्टीन, चहाच्या हातगाड्या, टपºयांवर सिगारेट, गुटखा, तंबाखूची सर्रास विक्री होते. या ठिकाणी बालकामगार काम करतात. ग्राहकांना चहा, नाश्त्याच्या आॅर्डरबरोबरच गुटखा, सिगारेट देण्याचे कामही करावे लागते. बेकायदापणे तंबाखूजन्य पदार्थ विकणाºया दुकानांवर दंडात्मक कारवाईचे आदेश आहेत. मात्र, अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईबाबत बोटचेपी भूमिका घेतली जात आहे. परिणामी छोट्या पानटपºयांपासून ते मोठमोठ्या किराणा मालाच्या दुकानापर्यंत सर्वत्र तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम बेकायदारीत्या विक्री होत आहे. त्यामुळे काही शाळांनी तंबाखूमुक्त शाळा परिसरासाठी पुढाकार घेतला, तरी तंबाखूजन्य पदार्थ कोठेही सहजगत्या उपलब्ध होत असल्याने शालेय जीवनातच व्यसनाकडे वळणाºया मुलांना त्यापासून रोखणे अशक्यप्राय झाले असल्याची खंत पालक वर्गातून व्यक्त होत आहे. अन्न व औषध प्रशासनाबरोबरच महापालिका प्रशासनाने शालेय परिसरांची तपासणी करून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कारवाई नाही : धूम्रपानबंदीच्या फलकांचा अभाव
शहरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास मनाई आहे. मात्र, चौकाचौकांत टपºयांबाहेर, हॉटेल, उद्यान परिसर या ठिकाणी खुलेआम धूम्रपान सुरू असते. काही हॉटेल व्यावसायिक, तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये धूम्रपान बंदीचे फलकही लावलेले नाहीत. पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाºया व्यक्तींवर विहित रकमेचे चलन फाडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. मात्र, शहरात अशा प्रकारची एकही कारवाई झाल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे ‘धुरांच्या रेषा हवेत’ सोडणाºयांचे प्रमाण वाढत असून शाळा, महाविद्यालय परिसरातही हे चित्र पाहायला मिळत आहे.