मतदानासाठी त्या बहारीनवरुन आल्या परंतु 'या' कारणाने करता आले नाही मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 06:49 PM2019-04-29T18:49:18+5:302019-04-29T18:50:04+5:30
बहारीन येथूून आलेल्या रसिका जाेशी यांचे नाव यादीतून वगळण्यात आल्याने त्यांना मतदान न करताच मतदान केंद्रातून परतावे लागले.
पिंपरी : लाेकशाहीचा उत्सव सध्या सुरु असून देशभरात लाेकसभेसाठी मतदान सुरु आहे. आज राज्यातील चाैथ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडले. पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरुर या दाेन मतदार संघामध्ये आज मतदान पार पडले. पिंपरी चिंचवड हे मावळ मतदार संघामध्ये येते. परदेशी कामानिमित्त असणारे अनेक मतदार येथे आहेत. त्यातीलच रसिका जाेशी या बहारीन या देशातून निगडी येथे मतदानास आल्या. गेल्या लाेकसभेला त्यांनी मतदान केले हाेते. यंदा त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्याने त्यांना मतदान करता आले नाही. हजाराे किलाेमीटरचा प्रवास करुन आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आलेल्या जाेशी यांना मात्र निराश हाेऊनच मतदान केंद्रावरुन परतावे लागले.
जाेशी या निगडी येथील रहिवासी असून सध्या त्या बहारीन या देशामध्ये वास्तव्यास आहेत. त्यांचे पती बहारीनमध्ये नाेकरी करत असल्याने त्या तिकडेच राहतात. मागील लाेकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुकांना त्यांनी आवर्जुन येत मतदान केले हाेते. यंदा देखील त्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भारतात आल्या. निगडी येथील शिवभूमी विद्यालयात त्यांचे मतदान हाेते. गेल्या लाेकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांना त्यांनी तेथेच मतदान केले हाेते. यंदा मात्र त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे त्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
लाेकमतशी बाेलताना जाेशी म्हणाल्या, मी खास मतदान करण्यासाठी बहारीन येथून निगडीला आले. गेल्या लाेकसभेला मी याच ठिकाणी मतदान केले हाेते. यंदा मात्र माझे नाव वगळण्यात आले. नाव वगळलेल्या, किंवा मयत नागरिक अशा कुठल्याच यादीमध्ये माझे नाव नव्हते. माझे नाव का वगळण्यात आले याचे कारण समजू शकले नाही. मी नाव वगळण्याचा किंवा पत्ता बदलण्याचा कुठलाही अर्ज केला नव्हता. मी निगडीत जेथे राहते त्या ठिकाणच्या इतर सर्वांचे नाव मतदार यादीत हाेते, केवळ माझेच नाव वगळण्यात आले. याबाबत मी प्रशासनाकडे दाद मागणार आहे.