देहूरोड येथे महामार्गावरच बंद पडली शिवनेरी बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 03:34 PM2018-07-19T15:34:44+5:302018-07-19T15:38:10+5:30
पुण्याहून दादरकडे निघालेली शिवनेरी बस देहूरोड येथील लोहमार्ग उड्डाणपुलाच्या एकेरी रस्त्यावर सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बंद पडली.
देहूरोड : पुण्याहून दादरकडे निघालेली शिवनेरी बस देहूरोड येथील लोहमार्ग उड्डाणपुलाच्या एकेरी रस्त्यावर सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बंद पडली. परिवहन मंडळाकडून प्रवाशांची पर्यायी व्यवस्था न झाल्याने त्यांना बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागले. राज्य परिवहन महामंडळाची पुणे-दादर शिवनेरी बस (एमएच ११ टी ९२६६) सकाळी सव्वादहा वाजता ही बस पुणे बसस्थानकातून दादरकडे जाण्यासाठी निघाली. परंतु, लोहमार्ग उड्डाणपुलाच्या उतार रस्त्यावर बसचे अचानक ब्रेक जाम झाल्याने ती जाग्यावरच थांबून राहिली. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती देहूरोड पोलिसांना कळवली. दरम्यान, महामार्गावर व देहूरोड परिसरातील महामार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती . बसमधील प्रवाशांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना देखील ही माहिती सांगितली. त्यावर पर्यायी बस पाठवित असल्याचे त्यांना सांगण्यात आले. तसेच पोलिसांनी उड्डाणपूलाच्या दुसऱ्या मार्गावरुन जाणारी वाहने थांबवत मुंबईकडे जाणारी वाहने सोडण्याची व्यवस्था केली. त्यामुळे वाहतूक संथगतीने सुरु झाली. तसेच एक क्रेन बोलावून बस बाजूला घेण्याचा तासभर प्रयत्न करण्यात आला. मात्र, चाके जॅम झाल्याने बस हलण्यास तयार नव्हती. बस चालकाने व प्रवाशांनी संबंधितांना कळवून अडीच तास उलटले तरी ब्रेक डाऊन व्हॅन व प्रवाशांसाठी पर्यायी बस न आल्याने प्रवासी हैराण झाले होते.