शिवसेना आमदार पुत्राचे प्रताप ; पोलीस अधिकाऱ्यांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 05:18 PM2018-07-09T17:18:50+5:302018-07-09T17:29:01+5:30
शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचे चिरंजीव मित्र, मैत्रिणींना बरोबर घेऊन कासारवाडीतील पुलावर वाढदिवस साजरा करत होते.
पिंपरी : कासारवाडीतील उड्डाणपुलावर मित्र मैत्रिणींबरोबर रात्री एकच्या सुमारास वाढदिवस साजरा करणाऱ्या आमदार पुत्राला हटकणाऱ्या पोलीस अधिकारी महिलेला कारवाईस सामोरे जावे लागले. आमदारांच्या तक्रारीमुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षक महिलेला नोटीस बजावली. त्या नोटीसला स्पष्टपणे दिलेले उत्त्तर, मांडलेली वस्तुस्थिती यामुळे अखेर पोलीस महिलेवरील कारवाई मागे घेण्यात आली. तसेच नियमभंग करणारे आमदार पुत्र आणि त्याचे सहकारी यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले असल्याने शहरात हा विषय चर्चेचा ठरला आहे.
पिंपरी विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचे चिरंजीव मित्र, मैत्रिणींना बरोबर घेऊन कासारवाडीतील उड्डाणपुलावर वाढदिवस साजरा करीत होते. काहीजण फटाके फोडण्याच्या तयारीत होते. रात्री एकच्या सुमारास भर रस्त्यात जल्लोषात वाढदिवस साजरा करण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरू होता. पोलीस उपनिरीक्षक रूपाली पाटील यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी ग्रुपला हटकले. रात्रीच्या वेळी सार्वजनिक शांततेचा भंग होईल, असे काही करू नका, असे समजून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी मी आमदारांचा मुलगा आहे. तुम्ही आम्हाला येथे वाढदिवस साजरा करण्यास मज्जाव करू शकत नाही असे आवाज चढवुन सांगितले.मात्र, पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी याठिकाणी वाढदिवसाचे सेलिब्रेशन करता येणार नाही,असे त्या मुलांना सांगितले. कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांच्या पालकांशी संपर्क साधून दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस ठाण्यात भेटा असा निरोपही दिला. मात्र, या घटनेनंतर आमदार चाबुकस्वार यांनी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार केली. पोलीस अधिकारी महिलेने मुलाच्या कानफटात मारले असाही आरोप करण्यात आला. २१ आॅक्टोबर २०१७ ला घडलेल्या या घटनेसंबंधी आलेल्या तक्रारीची पोलीस आयुक्त शुक्ला यांनी गंभीर दखल घेतली. पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावुन आपली एक वेतनवाढ का रोखली जावू नये, अशी नोटीस पाटील यांना बजावली.
पोलीस आयुक्त शुक्ला यांनी दिलेल्या नोटीसचा पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी खुलासा केला. घडलेल्या घटनेबद्दलची वस्तुस्थिती त्यांनी विशद केली. योग्य प्रकारे स्पष्टीकरण दिले असल्याने त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली. एवढेच नव्हे तर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या त्या मुलांवर कारवाई करा. असे आदेश शुक्ला यांनी दिले आहेत.