धक्कादायक ! अनधिकृत जमिनीचा ताबा हटविताना ज्येष्ठाने पोलिसाच्या पिस्तुलाला घातला हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 06:08 PM2021-02-26T18:08:58+5:302021-02-26T18:09:25+5:30
पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की करीत त्यांच्या कंबरेच्या डाव्या बाजुला लावलेल्या पिस्तुलाला आरोपीने हात घातला.
पिंपरी : अनधिकृत जमिनीचा ताबा काढण्यासाठी गेलेल्या पोलिसांना ज्येष्ठ नागरिकाने शिवीगाळ केली. पोलीस निरीक्षकांना धक्काबुक्की करीत त्यांच्या कंबरेला लावलेल्या पिस्तुलालाच हात लावल्याची घटना वाकड येथे घडली. त्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. शिवीगाळ करुन दहशत पसरविणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी अटक केली.
विजय निवृत्ती वाघमारे (वय ६०, वाकड गावठाण) असे आरोपीचे नाव आहे. वाकड पोलीस ठाण्यातील हवालदार दीपक नामदेव गायकवाड (वय ४९) यांनी फिर्याद दिली आहे. थेरगाव येथील मंडल अधिकाऱ्यांनी वाकड मधे जागेचा अनधिकृत ताबा घेतल्याचा अर्ज वाकड पोलीस ठाण्यात आला होता. जमिनीची मोजणी करुन अनधिकृत ताबा काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. त्यानुसार वाकड येथील वाघमारे भुयारी मार्गाजवळील जागेवर शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.१५) सकाळी पावणेबाराच्या सुमारास मोजणी सुरु होती. मोजणी करु नये आणि अनधिकृत ताबा काढू नये यासाठी मोजणी अधिकारी आणि पोलिसांना आरोपीने शिवीगाळ केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांना सूचना देत असताना त्यांनाही आरोपीने शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेला. पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की करीत त्यांच्या कंबरेच्या डाव्या बाजुला लावलेल्या पिस्तुलाला आरोपीने हात घातला. पिस्तूल लावलेल्या अडकवणीचा पट्टा ओढण्याचा प्रयत्न केला. आरोपीने सरकारी कामात अडथळा आणून शिवीगाळ केली. तसेच दहशत निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.