पिंपरी : आरटीओ, पोलीस यांच्याकडील आवश्यक कागदपत्रे ग्राहकांना बनावट तयार करून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणातील एका आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच एका पोलिसाला फरपटत नेऊन जखमी करून आरोपी पळून गेला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला अटक केली आहे.
तुकाराम अर्जून मगर (वय ३०, रा. गजानन नगर, काळेवाडी फाटा), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट कागदपत्र तयार करून देणाऱ्या आरोपींना अटक करण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागाची तीन पथके तयार करण्यात आली. आरोपी तुकाराम मगर याच्याही मागावर पोलीस होते. काळेवाडी फाटा येथे पहाटे पाचच्या सुमारास चारचाकी वाहनातून आरोपी मगर जात होता. त्यावेळी पोलिसांनी हात दाखवून त्याचे वाहन थांबवले. आम्ही पोलीस आहोत, असे पोलीस कर्मचारी संतोष बर्गे यांनी आरोपी मगर याला सांगितले. तुमचे पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवा, असे आरोपी मगर म्हणाला. बर्गे यांनी त्यांचे ओळखपत्र दाखविले. त्यावेळी आरोपीने गाडीच्या काचा एकदम जोरात वरती केल्या. त्यामुळे बर्गे यांचा हात अडकला. तरीही आरोपीने गाडी चालवून नेऊन १५ ते २० फुटांपर्यंत बर्गे यांना फरपटत नेले. यात ते जखमी झाले. तसेच गाडीसमोर उभे असलेले पोलीस कर्मचारी संदीप गवारी यांच्या अंगावर गाडी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहायक निरीक्षक नीलेश वाघमारे, उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, पोलीस कर्मचारी विजय कांबळे, अनंत यादव, संतोष बर्गे, संतोष असवले, नितील लोंढे, संदीप गवारी, सुनील शिरसाट, दीपक साबळे, महेश बारकुले, विष्णू भारती, अनिल महाजन, गणेश कारोटे, दीपक शिरसाट, मारोतराव जाधव, योगेश तिडके, गणेश गायकवाड, अतुल लोखंडे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.