पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या २७ सर्व्हर वर सायबर हल्ला झाल्याची घटना अडीच महिन्यापूर्वी उघड झाली. सर्व्हरमधून डेटा इनक्रिप्ट केला होता. त्यात सुमारे ५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा महापालिकेने केला होता. तक्रारही दाखल केली होती. अडीच महिन्यानंतर टेक महिंद्राने घुमजाव केले आहे. पाच कोटींचे नुकसान झाले नाही, असा दावा केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका स्मार्ट सिटीचे सर्व्हरवर हल्ला केला होता. त्यात ५ कोटींचे नुकसान झाल्याची तक्रार टेक महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली होती. घटनेनंतर दहा दिवसांनी प्रकल्प व्यवस्थापक महेंद्र लाठी यांनी पोलीसांत तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला होता. चोरी केलेला डेटा परत मिळवला जाऊ शकतो, असं सायबर पोलिसांनी सांगितलं होते. हॅकरने हा डेटा इनक्रिप्ट केला असून तो पुन्हा त्यांनाच डिइनक्रिप्ट करता येतो. त्यामुळे ते बिटकॉइनच्या स्वरूपात खंडणीची मागणी करीत आहेत, असे पोलिस तपासात पुढे आले होते.
याप्रकरणी लोकमतने आवाज उठविला होता. विमा लाटण्यासाठी हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी होती होती. तक्रार देण्यास विलंब का झाला, याबाबत विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आयुक्त राजेश पाटील यांनी कंपनीला नोटीस दिली.त्यानंतर कंपनीने खुलासा केला आहे.
सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘खुलासा करताना कंपनीने आम्ही पोलिसांत तक्रार दिली होती आणि त्यात ५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज दिला होता, पण प्रत्यक्षात त्यावेळी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे मिळून निश्चित किती नुकसान झाले त्याची आम्हाला माहिती नव्हती. पोलिस तक्रारीत ५ कोटींचा अंदाज दिला होता, पण नुकसान किती झाले याचा निश्चित तपास केला असता तो फक्त २७ सर्वरवर परिणाम झाला आहे. त्यांच्या पुर्नबांधणी पूरता आहे, असे लक्षात आले. पाच कोटी नुकसान झालेच नाही, असे कंपनीचे मत आहे. केवळ विमा लाटण्यासाठीच ५ कोटींच्या नुकसानीचा दावा कंपनीने केला होता, असे जवळपास सिध्द झाले आहे.’’