पिंपरी : घरातील फ्रिजमधून गॅस गळती होऊन स्फोट झाल्याने घराला आग लागल्याची घटना कासारवाडीतील सागर हाईट्स येथे घडली. दरम्यान अकरा वर्षीय नातवाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे आजोबासह कुटुंबातील सहा जणांचा जीव वाचला.
‘मॅक्स पॉल चाबुकस्वार’ असे या नातवाचे नाव आहे. कासारवाडी येथील सागर हाईट्स या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कदम कुटुंब राहते. रविवारी पहाटे पावणे दोनच्या सुमारास कदम यांचा नातू मॅक्स हा तहान लागल्यामुळे पाणी पिण्यासाठी उठला. त्याने फ्रीजचा दरवाजा उघडताच स्फोट होऊन आग लागली. प्रसंगावधान दाखवत तो कुटुंबातील सदस्यकडे गेला. अन् सर्वांना जागे केले. तातडीने सर्व जण राहत्या घराच्या बाहेर पडल्याने प्राण वाचले. कोणीही घरात न थांबता तातडीने घरातील विजेचे मुख्य बटन बंद केले.
दरम्यान , या आगीत मोठ्याप्रमाणात नुकसान झाले .या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. संत तुकाराम नगर, भोसरी येथील अग्निशमन केंद्राच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अर्धातास शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या यश आले. फ्रीज कॉम्प्रेसर मधून गॅस गळती झाल्यामुळे आग लागल्याचे समोर आले आहे. अग्निशमन अधिकारी अशोक कानडे, फायरमन लक्ष्मण ओवाळे, अमोल चिपळूणकर, बाळकृष्ण भोजने, कैलास डोंगरे, मोहन चव्हाण, महेश चौधरी, वाहन चालक देवा जाधव, प्रमोद जाधव शंकर ढाकणे यांच्या आग आटोक्यात आणली.