उद्योगनगरीत उपलब्ध होणार सहा हजार घरे - सतीशकुमार खडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 05:52 AM2018-03-12T05:52:28+5:302018-03-12T05:52:28+5:30

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील सर्वसामान्य, कष्टकरी कामगार वर्गाच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने वाल्हेकरवाडी, चिंचवड, तसेच भोसरी-मोशी सेक्टर १२ व सेक्टर ६ मध्ये गृहयोजना राबविण्यात येणार असून

 Six thousand houses will be available in the Udyogar - Satishkumar Khadke | उद्योगनगरीत उपलब्ध होणार सहा हजार घरे - सतीशकुमार खडके

उद्योगनगरीत उपलब्ध होणार सहा हजार घरे - सतीशकुमार खडके

Next

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील सर्वसामान्य, कष्टकरी कामगार वर्गाच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने वाल्हेकरवाडी, चिंचवड, तसेच भोसरी-मोशी सेक्टर १२ व सेक्टर ६ मध्ये गृहयोजना राबविण्यात येणार असून, सुमारे सहा हजार घरे उपलब्ध होणार आहेत. मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रामुळे आपली वेगळी ओळख निर्माण होण्यास मदत होणार आहे, असे मत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी सांगितले.

खडके म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड परिसरात औद्योगिक विकासाला सुरुवात झाली. देश-विदेशातील अनेक उद्योगसमूहांनी या परिसरामध्ये आपले उद्योग सुरू केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कामगारवर्ग देशाच्या विविध भागातून शहरात राहू लागले. कामगार कष्टकरी वर्गाच्या निवाºयासाठी नियोजनबद्ध नवनगर उभे करणे आवश्यक होते. कामगारांना घरकुल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १४ मार्च १९७२ रोजी प्राधिकरणाची स्थापना झाली. प्रत्येक शहराच्या निर्मितीमागे काही विशिष्ट प्रयोजन असते. आदर्श नवनगर निर्मिती हा मानवाच्या आणि समाजाच्या प्रगत जीवनातील एक महत्त्वाचा भाग समजला जातो. हे नवनगर रचनात्मक भूमिकेतून उभे राहिले आहे. उत्तम पेठा तयार झाल्या. मोठे रस्ते, क्रीडांगणे, उद्याने, शैक्षणिक, वैद्यकीय, व्यापारी सुविधा उपलब्ध झाल्या. ‘नगरेची रचावी। जळाशये निर्मावी। महावने लावावी नानाविध।’ या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीमध्ये नवनगराचे महत्त्व उद्धृत केले आहे.’’
‘‘नवनगरासाठी ४३२३ हेक्टर क्षेत्र नामनिर्देशित करण्यात आले. तसेच नियोजन आणि नियंत्रणाखाली १७३९ हेक्टर क्षेत्र, संपादनाखालील २५८४ हेक्टर क्षेत्र होते. निवाड्यानंतर निव्वळ संपादनाखाली राहिलेले क्षेत्र १८४० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी प्रत्यक्ष ताब्यात आलेले क्षेत्र १४७१ हेक्टर असून, विकसित क्षेत्र १३२५ हेक्टर क्षेत्र आहे. प्राधिकरणाने एकूण ४२ नियोजित पेठा आणि ४ व्यापारी केंद्र विकसित केले आहे. विकसित पेठा २४ आणि ३ व्यापारी केंद्रे आहेत. आतापर्यंत प्राधिकरणाने ३४ गृहयोजना राबविल्या असून, एकूण ११२२१ सदनिकांची निर्मिती केली आहे. वाणिज्य प्रयोजनाचे २३१ गाळे आहेत. एकूण विकसित केलेले भूखंड ६९७९ असून, व्यापारी व औद्योगिक वापरासाठी ७०५ भूखंड निर्माण केले आहेत. ट्रॅफिक पार्क, स्पाईन रस्त्यावरील टाटा मोटर्स येथील उड्डाणपूल, औंध-काळेवाडी रस्त्यावरील उड्डाणपूल, भक्ती-शक्ती समूह शिल्प, वाल्हेकरवाडी ते भोसरी स्पाईन रोड, भोसरी परिसरातील नाला ट्रेनिंग, नाला सुशोभीकरण, असे ठळक प्रकल्प प्राधिकरणाने विकसित केले आहेत. तसेच मोशी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या कामासही गती मिळाली.’’
‘‘मध्यंतरीच्या कालखंडामध्ये घरकुल उभारण्याचे प्रकल्प काही काळ थंडावले होते. त्यास गती देण्याचे काम सुरू झाले आहे. वाल्हेकरवाडी-चिंचवड येथील प्रकल्पाला गती मिळाली आहे. या ठिकाणी अल्प, मध्यम उत्पन्न गटातील घटकांसाठी घरकुलाचे काम सुरू आहे. घरकुल उभारणीसाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे. तसेच सेक्टर १२मध्ये सुमारे ४९५० घरांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच सेक्टर ६ मध्ये ९०० सदनिकांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सर्वसामान्य कष्टकरीवर्गाचे घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्राधिकरणाच्या वतीने प्रयत्न सुरू असून, त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. आगामी कालखंडामध्ये सुमारे सहा हजार घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे, असेही खडके म्हणाले. पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी म्हणून परिचित असून, पुणे-नाशिक महामार्गावरील प्राधिकरणाच्या मोशी परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार असून, त्याचा विकास टप्प्याटप्प्याने करण्यात येणार
आहे. हे कामही सुरू झाले आहे. पूर्वीच्या केंद्र आराखड्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार नवीन आराखडा तयार करून काम सुरू झाले आहे.
आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचा विकास पूर्ण झाल्यानंतर या केंद्रामुळे आपली वेगळी ओळख निर्माण
होणार आहे. पहिल्या टप्प्यात
प्रदर्शन केंद्रासाठी आवश्यक त्या भौतिक सुविधांची निर्मिती केली जाणार आहे.’’

Web Title:  Six thousand houses will be available in the Udyogar - Satishkumar Khadke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Homeघर