धूम्रपान बंदी कायदा कागदावरच  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 03:08 AM2018-05-27T03:08:27+5:302018-05-27T03:08:27+5:30

  तंबाखूच्या किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाची दखल घेऊन शासनाने २00८ पासून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदीचा निर्णय घेतला. निर्णयाला जवळपास दहा वर्षांचा काळ पूर्ण झाला.

 Smoking Ban Act on Paper | धूम्रपान बंदी कायदा कागदावरच  

धूम्रपान बंदी कायदा कागदावरच  

googlenewsNext

रहाटणी -  तंबाखूच्या किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाची दखल घेऊन शासनाने २00८ पासून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदीचा निर्णय घेतला. निर्णयाला जवळपास दहा वर्षांचा काळ पूर्ण झाला. तरीही या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. हा कायदा अस्तित्वात आला असला तरी त्याची ठोस अशी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. कायदा कडक असला तरी अंमलबजावणी करणाºयांचीच मानसिकता कमकुवत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. त्यामुळे दोष कुणाचा कायद्याचा की कायदा हाताळणाºयांचा हा खरा प्रश्न आहे.

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करून दंड वसूल करण्याचे निर्देशित करण्यात आले. या दहा वर्षांत किती नागरिकांवर कारवाई करण्यात आली़ हा खरा संशोधनाचा विषय आहे. परंतु दहा वर्षांचा कालावधी संपला तरी शहरात अनेक सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान सुरूच आहे.
हा कायदा केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येते. शहरातील बसथांबे, शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी संस्था यासह अनेक सार्वजनिक ठिकाणी अनेक जण खुलेआमपणे बीडी, सिगारेट पिताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला असणाºया जनसामान्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे यामुळे या परिसरात नियमित व्यवसाय करणाºया दुकानदारांच्या आरोग्याला धूम्रपानाचे नाहक दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत.
परंतु प्रशासकीय यंत्रणेने या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. कायद्यानुसार १८ वर्षाच्या खालील मुलाने तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास मनाई आहे. परंतु पानटपरीवर बसून लहान मुले सर्रास तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना दिसत आहे. त्यामुळे अशा दुकानातून त्या मुलांचे समवयस्क मुले त्यांच्याकडून तंबाखूजन्य पदार्थ सहज मिळवितात.
त्यामुळे अन्न व प्रशासन विभागाने परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या बंदीच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अनेक जण सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन करतात.

पिंपरी-चिंचवड शहरात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात असून, त्यामुळे अनेकांना तोंडाचे आजारसुद्धा बळावत असल्याचे निदर्शनास येत आहे. शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयाच्या १00 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असली तरी त्यांच्या दाराला लागूनच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीचे दुकाने थाटात उभे आहेत. कार्यालयीन कर्मचारी खुलेआम सदर दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करून सेवन करीत आहेत. खुलेआम अशा पदार्थांची विक्री होत असताना प्रशासनाने मात्र झोपेचे सोंग घेतल्याचे दिसून येत आहे. याला काय म्हणायचे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सतावत आहे. मी करतो मारल्या सारखे तुम्ही करा रडल्यासारखे अशी परिस्थिती सध्यातरी दिसून येत आहे.

शासनाच्या धोरणानुसार राज्यात गुटखा बंदी करण्यात आली असली तरी शहरात खुलेआम गुटखा विक्री सुरूआहे. हा गुटखा येतो कुठून व विक्री करणारे एवढे बिनधास्त विक्री करतात कसे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सतावत आहे. शहरातील एकही पानटपरी अशी नाही की तेथे गुटखा मिळत नाही याची कल्पना देखील पोलीस प्रशासन व संबंधित
विभागाच्या अधिकाºयांना आहे तरी तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणत आर्थिक देवाण घेवाण करून हा व्यवसाय खुले आम सुरू आहे. जर बाजारात खुले आम गुटखा मिळतच असेल तर गुटखा बंदी कायदा केला कशासाठी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सतावत आहे.

माव्याच्या व खर्रा जोमात
सध्या शहरात राज्यातील व राज्याबाहेरील कानाकोपºयातील नागरिक वास्तव्यास आहेत. प्रत्येक भागात अमूक एक प्रकार प्रसिद्ध असतो म्हणून सध्या पिंपरी-चिंचवड शहारत नगरचा मावा इथे मिळतो तर नागपूरचा खर्रा मिळतो, अशी प्रसिद्धी करणारे पाट्या पानटपरी विक्रते लावीत आहेत. राज्यात गुटखा बंदी असली तरी मावा व खाणाºयाने शहरातील नागरिकांना भुरळ घातली आहे़ तंबाखू खाणाराही मावा व खर्रा खाताना दिसून येत असले तरी तरुण वर्ग याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसून येत आहे.

Web Title:  Smoking Ban Act on Paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.