वाढले तथाकथित समाजसेवक
By admin | Published: December 24, 2016 12:30 AM2016-12-24T00:30:39+5:302016-12-24T00:30:39+5:30
महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच गेल्या पाच वर्षांत नागरिकांना ज्याचे नावही माहीत नाही, ज्यांचा कधी चेहराही
वाकड : महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच गेल्या पाच वर्षांत नागरिकांना ज्याचे नावही माहीत नाही, ज्यांचा कधी चेहराही पाहिला नाही अशा इच्छुकांनी प्रभागात समाजोपयोगी कामांचा धडाका लावल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी जणू समाजसेवेचा पुळकाच आल्याचे चित्र शहरात सर्वत्र आहे.
एरवी राजकारणापासून आम्ही दूर राहतो, असे म्हणणारे अनेक जण, तर काहीजण अगदी विशीतल्या वयाचे नवखे चेहरे ज्यांचे शिक्षण अपुरे किंवा शिक्षण झालेच नाही. मात्र, गुंठेवारीमुळे आलेल्या वारेमाप गडगंज पैशांच्या जोरावर लक्ष्य २०१७ म्हणत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची नावे समोर येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मी कसा खरा समाजसेवक आहे हे पटवून देण्यात सध्या मग्न आहेत, त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारीदेखील त्यांची आहे. नोटाबंदीनंतर सर्वत्र मंदीचे सावट पसरले असताना इच्छुकांच्या खिशाला मात्र तसूभरही झळ बसली नसल्याचे वास्तव त्यांच्या उत्साहावरून दिसत आहे. इच्छुक सध्या भेटीगाठी घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात मग्न आहेत.
दिवाळीला फराळाच्या पिशव्या, उटणे, पणत्या व अन्य गिफ्ट देण्यास सुरुवात करीत आता निवडणूक जसजशी जवळ येईल, तसे उमेदवार पिण्याच्या पाण्याची सोय करून देत आहेत. मोफत पाण्याचा टँकर देणे, स्वखर्चाने ड्रेनेज लाइन साफ करून देणे अशा कामांवर भर देत जणू लोकांच्या सेवेत आम्ही सदैव तत्पर आहोत, असे चित्र भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्रभागात वृक्षारोपण, डास निर्मूलन मोहीम, स्वच्छता अभियान अशा मोहिमा आघाडीवर आहेत, तर काही ठिकाणी गरज नसतानादेखील केवळ चमकोगिरीसाठी हे उपक्रम राबवीत आहेत. तर मतदारनोंदणी व जनजागृती अभियान, आधार नोंदणी, आधार स्मार्ट कार्ड, पॅन कार्ड असे विविध मोफत कॅम्प लावून त्याद्वारे नागरिकांची सोय करून दिली जात आहे. अनाथालये, वृद्धाश्रम शाळांना भेट देत फळे, शालेय साहित्य अशा भेटवस्तू दिल्या जात आहेत.
महिनाअखेर आणि त्यातच नाताळच्या सुट्या अनेकांना लागल्याने समाजसेवेबरोबरच धार्मिक यात्रा आणि सहलींचे देखील सर्वत्र आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये तिरुपती बालाजी, श्रीक्षेत्र तुळजापूर, कोल्हापूर, शेगाव, अक्कलकोट इत्यादी धार्मिक स्थळांना पसंती दिली जात आहे. याच बरोबर स्वत:चे ब्रॅण्डिंग करण्यासाठी मेगा इव्हेंटची रेलचेल सुरू आहे. मतदारांना बक्षिसांद्वारे आकर्षित करण्याचे प्रयत्न इच्छुक करीत आहेत. यामध्ये टीव्ही मालिकांतील चला हवा येऊ द्या, होम मिनिस्टर आदी कार्यक्रमांची आणि कलाकारांची हवा आहे. व्हाट्स अॅप, फेसबुक, यू ट्यूब आदी सोशल मीडियावरून सकाळ-संध्याकाळी गुड मॉर्निंग, गुड नाईट यासह शुभेच्छा संदेश व त्याखाली उमेदवाराचा फोटो अशा आशयाच्या संदेशांचा सध्या मतदारांवर भडिमार केला जात आहे, तर अनोळखी चेहऱ्याचे अनेक युवा नेते पोस्टर आणि फ्लेक्सवर झळकल्यामुळे मतदार तर तोंडावर हात ठेवत आहेत; मात्र या फ्लेक्सबाजीमुळे विद्रूपीकरणात भर पडत आहे. (वार्ताहर)