पिंपरी : साॅफ्टवेअर इंजिनियर असलेल्या तरुणीला एका उच्चशिक्षित तरुणाने लग्नाचे आमिष दाखविले. गोवा, महाबळेश्वर आणि हिंजवडी येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याार केला. सरकारी नोकरीसाठी तरुणीकडून ११ लाख ६५ हजार ६५७ रुपये घेऊन फसवणूक केली. तसेच तिच्या होणाऱ्या पतीला याबाबत सांगण्याची धमकी दिली. हा प्रकार २०१८ ते २०२१ या कालावधीत घडला.
युवराज आनंदराव पाटील (वय २७, रा. रेंदाळ, हातकणंगले, जि. कोल्हापुर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित २७ वर्षीय तरुणीने ३१ मे २०२२ रोजी कोल्हापूर येथील शिरोळे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तेथून हा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी साॅफ्टवेअर इंजिनियर आहे. तसेच आरोपी तरुण देखील उच्चशिक्षित आहे. आरोपीने फिर्यादीसोबत मैत्री करून प्रेमसंबंध निर्माण केले. लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीला गोवा आणि महाबळेश्वर येथे नेऊन तसेच हिंजवडी येथे फ्लॅटवर एकत्र राहून फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केला.
फिर्यादी तरुणीचा आरोपीने विश्वास संपादन केला. आरोपीने त्याच्या कंपनीत प्रॉब्लेम झाला असल्याचे सांगून सरकारी नोकरीसाठी पैसे पाहिजे, असे कारण देत फिर्यादीकडून ११ लाख ६५ हजार ६५७ रुपये घेतले. फिर्यादीने आरोपीकडे पैशांची मागणी केली असता त्यातील एक लाख ५९ हजार रुपये आरोपीने परत केले. अन्य पैशांची मागणी केली असता आरोपीने फिर्यादीसोबत केलेल्या कृत्याची माहिती तिच्या होणाऱ्या नवऱ्याला सांगून तिचे जमलेले लग्न मोडण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलीस निरीक्षक सपना देवतळे तपास करीत आहेत.