अनधिकृत बांधकाम कोसळून मुलगा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 06:08 AM2017-07-28T06:08:24+5:302017-07-28T06:08:24+5:30
संत तुकारामनगर येथे भर पावसात घाईघाईत सुरू असलेले अनधिकृत बांधकाम कोसळले. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
पिंपरी : संत तुकारामनगर येथे भर पावसात घाईघाईत सुरू असलेले अनधिकृत बांधकाम कोसळले. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. रस्त्याने जाणाºया चौदा वर्षाच्या मुलाच्या अंगावर भिंत पडल्याने डोक्याला गंभीर इजा झाली. अवैध बांधकामे नियमितीकरण, शास्ती माफीचे मुद्दे चर्चेत असताना, नागरिकांना वाढीव बांधकामे करण्याचा मोह आवरेनासा झाला असल्याचे या निमित्ताने निदर्शनास आले आहे.
संत तुकारामनगर येथे म्हाडाने उभारलेल्या गृहप्रकल्पातील गाळेधारकांनी छोट्या जागेत मोठे इमारतीचे इमले उभारले आहेत. या भागात सर्वत्र अशी बांधकामे दिसून येतात. अमरज्योत मित्र मंडळ चौकाजवळ अन्वर शेख यांच्या घराचे गुरुवारी वाढीव बांधकाम सुरू होते. दुसºया मजल्यावर वीट बांधकाम केले जात होते. त्या वेळी जवळच राहाणाºया गोणते कुटुंबातील निनाद हा चौदा वर्षांचा मुलगा बिस्किट घेण्यासाठी दुकानात जात होता, त्याचवेळी १५ फूट उंचीवरून सिमेंट, वाळू व विटा खाली पडल्या. बांधकाम सुरू असलेली भिंत निनादच्या अंगावर कोसळली. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. निनादचे आईवडील मावळात गेले होते. घरी निनादला सांभाळण्यासाठी त्याची आजी थांबली होती. निनाद जखमी झाल्याने आजीची धावपळ उडाली. रस्त्यावरील चार दुचाकी विटांच्या ढिगाºयाखाली अडकल्या.
२० हजार द्या अन् अनधिकृत बांधकाम करा!
एकीकडे अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. दंड आकारून अशी बांधकामे नियमित केली जातील, असे धोरण
शासनाने जाहीर केल्यानंतरही अनधिकृत बांधकामे नियंत्रणात मात्र येत नाहीत.
नागरिकांनी जोखीम पत्करून अशी बांधकामे सुरूच ठेवली आहेत. अधिकाºयांना २० हजार द्या अन् बिनधास्त बांधकाम करा, अशी या भागात स्थिती असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.
घरमालकावर गुन्हा
सुरक्षेची काळजी न घेतल्याप्रकरणी घरमालक अन्वर उस्मान शेख (रा. संत तुकारामनगर) यांच्याविरुद्ध संत तुकारामनगर पोलीस चौकीत गुन्हा दाखल झाला आहे. हेमंत खंडू गोणते (वय ४६) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.