प्रकाश गायकर पिंपरी : आईची प्रकृती अचानक बिघडली म्हणून स्वत:च्या वाहनातून आईला यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. वयामुळे सांधेदुखी व स्मृतिभ्रंश झालेल्या आईवर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. पोटच्या दोन मुलांसोबत सुनेनेही तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने आईला हायसे वाटत होते. मात्र सायंकाळी ‘आई तुझ्यासाठी चहा आणतो’ असे बोलून गेलेला मुलगा दोन महिन्यांनंतरही आईला भेटायला फिरकली नाहीत. त्यामुळे आई आजही वायसीएममधील जनरल रुग्णांच्या वॉर्डमध्ये मुलांची वाट पाहत आहे. मीरा भालचंद्र म्हेत्रे (वय ७५) असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. याबाबत घडलेली हकीगत अशी, १७ सप्टेंबर या दिवशी वृद्ध महिलेला अचानक सांधेदुखीचा जास्त त्रास होऊ लागला. उठणे बसणे कठीण होऊ लागले. त्यांच्या दोन्ही मुलांनी आणि सुनेने त्यांना रामवाडी, येरवडा येथून स्वत:च्या वाहनातून वायसीएम येथे आणले. सकाळी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. त्यांची तब्येत नाजूक असून त्यांना काही दिवस रुग्णालयातच भरती करावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी मुलांना सांगितले. दोन्ही मुलांनी डॉक्टरांना तुमच्या पद्धतीने उपचार करण्याचे सांगितले. त्यानंतर महिलेला रुग्णालयात भरती करून घेत, जनरल वॉर्डमध्ये औैषधोपचार सुरू केले. दुपारी एका मुलाने व सुनेने आईला ‘पुन्हा आमच्या घरी येऊ नको’ असे म्हणत दम दिला. त्यानंतर दोघेही रुग्णालयातून बाहेर गेले. सायंकाळच्या वेळेस दुसरा मुलगा ‘आई मी तुझ्यासाठी चहा घेऊन येतो’ असे बोलून निघून गेला. मात्र आता दोन महिने होत आले तरीही घरच्या एकाही व्यक्तीने आईची भेट घेतली नाही. चहा आणण्यासाठी गेलेल्या मुलाची आई अजूनही वाट पाहत आहे. मात्र चांगल्या सधन घरातील लोकही अशाप्रकारे आई-वडिलांना वाºयावर सोडत असल्याचे यामुळे समोर आले आहे. ......अशाप्रकारे रुग्णांना बेवारस सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या घटनेमध्ये दोघा मुलांनी संगनमत करून रुग्णालयामधून पळ काढला आहे. वृद्ध आई-वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी ही नवीन पिढी घेत नाही. अशाप्रकारे बेवारस सोडून जाणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. या घटनेतील मुलांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’’- एम. ए. हुसैैन, संस्थापक, रिअल लाइफ रिअल पीपल. वायसीएम रुग्णालयातील ‘रिअल लाइफ रिअल पीपल’ या संस्थेने या वृद्ध महिलेची जबाबदारी स्वीकारली. दोन महिने या महिलेची देखभाल केली. यामध्ये समाजसेवक महादेव बोत्रे, कुंडलिक आमले, रेणुका शिंदे, उल्हास चांगण, आकाश शिरसाट, मिलिंद माळी, दत्ता वाघमारे यांनी महिलेची शुश्रुषा केली. तसेच या महिलेच्या मुलांना शोधण्यासाठीही संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.
आईसाठी चहा आणायला गेलेला मुलगा परतलाच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 4:33 PM
आईला बेवारस सोडून दोघा मुलांनी केले पलायन
ठळक मुद्देवायसीएममधील घटना : ‘रिअल लाइफ रिअल पीपल’ने केले पुनर्वसन रुग्णांना बेवारस सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले