लवकरच २४ तास पाणी
By admin | Published: August 29, 2016 03:12 AM2016-08-29T03:12:28+5:302016-08-29T03:12:28+5:30
पाण्याची नासाडी रोखण्यासाठी आणि नागरिकांचे निरामय आरोग्य कायम ठेवण्यासाठी पिंपरी-चिंवचड महापालिकेच्या वतीने २४ बाय ७, अर्थात चोवीस तास पाणीपुरवठ्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे
पिंपरी : पाण्याची नासाडी रोखण्यासाठी आणि नागरिकांचे निरामय आरोग्य कायम ठेवण्यासाठी पिंपरी-चिंवचड महापालिकेच्या वतीने २४ बाय ७, अर्थात चोवीस तास पाणीपुरवठ्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या या प्रयत्नातून सर्वांना समान पाणीवाटप, पाणी बचत, जलजन्य आजारांपासून शहरवासीयांची सुटका होणार आहे.
पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीची बेस्ट सिटीनंतर स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. उद्योगनगरीचा स्मार्ट सिटीत समावेश झाला नसला, तरी स्मार्ट योजना राबविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यापैकीच एक योजना म्हणजे चोवीस तास पाणीपुरवठा होय. पवना धरणातून शहराला पाणीपुरवठा होतो. मंजूर कोटा ४६० एमएलडी असा आहे. सध्याचा पाणीपुरवठा २०२१पर्यंत पुरेसा आहे. सध्या शहराची लोकसंख्या वीस लाखांवर पोहोचली आहे. तर शहरात मीटरची संख्या १ लाख ४१ हजार एवढी आहे.
शहरातील जलवाहिन्या या १८०० किलोमीटर लांबीच्या आहेत. चोवीस तास पाणीपुरठ्यात तीन टप्पे केले आहेत. पहिला टप्पा यमुनानगर, निगडी प्रभागात सुरू झाला आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात शहरातील चाळीस आणि पन्नास टक्के भागाचा समावेश यात केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २४० कोटींच्या कामांना केंद्र आणि राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यापैकी १४३ कोटींपैकी ११६ कोटींची कामे सुरू झाली आहेत.
पहिल्या टप्प्यातील चाळीस टक्के भागाचा विचार करून कामास सुरुवात झाली आहे. केंद्राच्या अमृत योजनेतूनही या प्रकल्पाला निधी मिळणार आहे. यामध्ये प्रथम संबंधित भागाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच घरांपर्यंत पोहोचणाऱ्या वाहिन्यांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. तसेच या संदर्भातील आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानंतर वाहिन्या बदलण्यात येणार आहे. सध्याच्या वाहिन्या या जीआय पाइपच्या आहेत. या वाहिन्या सहा ते सात वर्षांत गंजतात. लिकेज होऊन पाण्याची गळती होते. तसेच पाण्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. त्यासाठी एमडीपी पाइप वापरण्यात येणार आहेत. त्यांचे आयुर्मान हे किमान तीस वर्षे आहे. पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित पन्नास टक्के भागात ही योजना राबविण्यात येणार आहे. येत्या दहा वर्षांत शहरातील सर्व पाणीपुरवठा २४ तास करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)