कंटेन्मेंट झोन वगळून उद्योगांना लवकरच परवानगी : श्रावण हर्डीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 10:10 PM2020-05-09T22:10:50+5:302020-05-09T22:11:09+5:30
महापालिका हद्दीतील कंपन्या अटी शर्थीवर सुरू करण्यासाठी प्रयत्न
पिंपरी : कोरोना लॉकडाऊनमुळे पिंपरी-चिंचवडएमआयडीसीतील हजारो उद्योग बंद आहेत. ते सर्व उद्योग सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. येत्या आठवड्यात महापालिका हद्दीत नॉन ''कंटेन्मेन्ट झोन'' मधील असलेले उद्योग सुरू करण्यास लवकरच परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
पिंपरी चिंचवड शहरातील उद्योग सुरू करण्याबाबत महापालिका भवनात शनिवारी दुपारी बैठक झाली. या वेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उद्योजक विनोद बन्सल, बालाजी अय्यर आदी या वेळी उपस्थित होते.
आयुक्त हर्डीकर म्हणाले, महाराष्ट्र राज्य उद्योग सचिव भूषण गगराणी यांना पिंपरी -चिंचवड परिसरातील नॉन कंटेन्मेंट झोनमधील उद्योग सुरू करण्याबाबत प्रस्ताव पाठवला आहे. मंगळवारपर्यंत (दि. १२) महाराष्ट्र शासनाकडून परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात येथील उद्योग सुरू करण्यास परवानगी देता येईल. महापालिका परिसर रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे येथील उद्योग चालू करण्यासाठी स्वतंत्र नियमावली व अर्ज करण्यासाठी स्वतंत्र अॅप व पोर्टल तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळाल्यानंतर उद्योजकांनी आपले अर्ज या अॅ प किंवा पोर्टलवर सादर करावेत. उद्योग सुरू केल्यानंतर सर्व नियम व अटींचे पालन उद्योजकांनी करावे.
आयुक्त हर्डीकर यांना या वेळी उद्योजकांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. चाकण, तळेगाव, रांजणगाव, बारामती आणि शिक्रापूर परिसरातील उद्योग सुरू करण्यात आले. मात्र, पिंपरी-चिंचवड परिसरातील उद्योग बंदच आहेत. त्यामुळे उद्योजकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. शहर परिसरातील सात ते आठ हजार एमएसएमई लघुउद्योजक वाहन व इतर सुट्या भागांचे पुरवठादार आहेत. जगभरात तसेच देश व राज्यातील विविध भागात मोठ्या उद्योगांना त्यांच्याकडून पुरवठा केला जातो. मात्र, पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील उद्योग बंद असल्यामुळे त्यांच्याकडील काम जाण्याची शक्यता आहे. कामगारसुद्धा इतरत्र कामासाठी जाण्याची सुरुवात केली आहे. उद्योग सुरू करण्यास आणखी विलंब झाल्यास अनेक उद्योग कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता आहे, अशी माहिती संदीप बेलसरे यांनी दिली.