सोने खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: May 10, 2016 12:33 AM2016-05-10T00:33:01+5:302016-05-10T00:33:01+5:30
शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचे महत्त्व आहे. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा शुभमुहूर्त. या मुहूर्ताचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवडकरांनी मोठ्या प्रमाणात सोनेखरेदी केली.
पिंपरी : शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचे महत्त्व आहे. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा शुभमुहूर्त. या मुहूर्ताचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवडकरांनी मोठ्या प्रमाणात सोनेखरेदी केली.
बंदमुळे गुरुपुष्यामृत, पाडवा अशा विविध मुहूर्तांवर ग्राहकांना सोनेखरेदी करता आली नाही. त्याचा फटका सराफांनाही बसला होता. त्यामुळे ४२ दिवसांच्या बंदनंतर सराफांची दुकाने १० दिवसांपासून अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तासाठी सज्ज झाली. दुकाने सुरू झाल्यानंतर सोनेखरेदीचा पहिलाच मुहूर्त आल्यामुळे दुकानांमध्ये जोरदार तयारी सुरू झाली. वेगवेगळ्या कलाकृतीचे सोन्याचे दागिने व्यावसायिकांकडून विक्रीस आणले गेले. काही सराफांकडून दागिन्यांच्या घडणावळीवर सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करण्यात आले.
सोमवारी सकाळी दहा पासूनच बाजारपेठेत सोनेखरेदीसाठी गर्दी होती. वेगवेगळे ब्रँड व आॅनलाइन बाजारपेठही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असली, तरी अजूनही पारंपरिक सराफांकडून सोनेखरेदीकडे लोकांचा कल आहे. नेहमीच्या सुवर्णकाराचे दुकान बंद असल्यामुळे लोकांनी काही दिवस सोने खरेदी केले नाही. मे महिन्यात या वर्षी लग्नाचे मुहूर्त नाहीत. परंतु जून व जुलै महिन्यातील लग्नाच्या मुहूर्तासाठी लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सोने खरेदी केले. काहींनी सराफ व्यावसायिकांचा बंद मागे झाल्यावरच अक्षय्य तृतीयेला मिळतील असे नियोजन करून दागिन्यांचे आगाऊ बुकिंग करून ठेवले होते. सोन्याचा भाव २४ कॅरेटसाठी ३० हजार, तर २३ कॅरेटच्या दागिन्यांसाठी २९५०० रुपये इतका होता. चांदीचा भाव ४२ हजार रुपये किलोइतका होता. (प्रतिनिधी)