पिंपरी : महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाणी आणि मिळकत कर वाढ होणार की नाही, याबाबतची उत्सुकता संपली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने मिळकतकरात कोणतीही वाढ न करण्याचा विषय मंजूर केला आहे. त्यामुळे आगामी वर्षात मिळकतकरात वाढ होणार नसल्याचा सुखद धक्का शहरवासीयांना मिळाला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत स्थायी समिती समोर सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात पाणी आणि मिळकत कर वाढीचे नियोजन प्रशासनाने केले होते. याबाबत आमदार आणि भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी करवाढ करू नये, अशी सूचना केली होती. तसेच करवाढीपेक्षा नोंदणी नसलेल्या मिळकतींचा शोध घ्यावा, नोंदणी करून करवसुली वाढवावी, अशी सूचना प्रशासनास केली होती. त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी करवाढीऐवजी मिळकतींचे सर्वेक्षण करणार असल्याचे जाहीर केले होते. आज झालेल्या स्थायी समितीत करवाढ न करण्याचा निर्णय घेतला. याबाबत माहिती देताना विलास मडिगेरी म्हणाले, ‘‘मिळकत कर वाढवू नये, अशी भाजपाची भूमिका होती. शहराध्यक्षांनी सूचविलेल्या नुसार मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच मिळकती शोधून देणाऱ्यांना सामान्य कराच्या दहाटक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांगासाठी असणाºया संस्थांना मिळकत करात पन्नास टक्के सवलतीचा विषयही मंजूर केला आहे.’’नोंदणीने उत्पन्नात होणार वाढपिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात ४ लाख ८२ हजार मिळकती आहेत. त्यापैैकी ४ लाख ८ हजार मिळकती निवासी आहेत. तर ४३ हजार मिळकती बिगरनिवासी आहेत. करयोग्य मूल्याच्या टप्प्यानुसार निवासी मालमत्तांसाठी १ ते १२ हजार रुपयांपर्यंत १३ टक्के. १२ हजार ते ३० हजारांपर्यंत १६ टक्के. ३० हजार आणि त्या पुढील मुल्यांसाठी २४ टक्के दर धरला जातो.
स्थायी समिती : महापालिका अर्थसंकल्पात मिळकतकरात नाही वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 1:23 AM