भुयारी मार्गाची दुरुस्ती
By admin | Published: October 1, 2015 12:49 AM2015-10-01T00:49:20+5:302015-10-01T00:49:20+5:30
कासारवाडीतील शंकरवाडीतील रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्गात नेहमीच साचणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे वाहनचालक आणि पादचारी वैतागले होते.
पिंपरी : कासारवाडीतील शंकरवाडीतील रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्गात नेहमीच साचणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे वाहनचालक आणि पादचारी वैतागले होते. पाणी साचू नये म्हणून एका बाजूचा कठडा तोडून वाट करून दिली आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत आहे. मात्र, ही दुरुस्ती समाधानकारक नसल्याचे नागरिकांचे मत आहे.
‘भुयारी मार्गात नेहमीच सांडपाणी : वाहनचालक, पादचारी त्रस्त’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने ३ आॅगस्टला छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापालिकेच्या ‘क’श्रेत्रीय कार्यालयाने सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी काम नुकतेच केले. कासारवाडीहून ग्रेडसेपरेटरच्या सर्व्हिस रस्त्यावर जाण्याच्या बाजूने भुयारी पुलाजवळ भूमिगत गटारास झाकण लावले आहे. तेथून भुयारी वाहिनी टाकून नाल्यात वाट करून दिली आहे. शेजारच्या नाल्यास असलेला कॉँक्रिटचा कठडा तोडून पाण्यास वाट करून दिली आहे. गणेशोत्सवकाळात झालेल्या धुवाधार पावसाचे पाणी येथे मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. हे पाणी नाल्यात जात आहे. मात्र, ही सोय पुरेशी नसल्याने पूर्ण क्षमतेने पाणी वाहून जात नाही. भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा साचून राहतो. त्यामुळे दुर्गंधी कायम आहे. अशाच स्थितीत नाइलाजास्तव चालकांना ये-जा करावी लागत आहे. या तात्पुरत्या दुरुस्तीमुळे नागरिकांचे समाधान झालेले नाही. भुयारी मार्गात पाणी बिलकूल साचणार नाही, या पद्धतीने काम करावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे काम करण्यात आले. मात्र, अद्याप एका बाजूने भुयारी मार्ग बंद आहे. तसेच, खोदलेल्या भूमिगत वाहिनीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले गेले नाही. नुकतीच त्यावर राडारोडा टाकून दुरुस्ती केली आहे.
पावसाळ्यात ग्रेडसेपरेटरवरून येणारे पाणी उतारावरील भुयारी मार्गात साचते. गुडघ्यापेक्षा अधिक पाणी साचत असल्याने दुचाकी आणि मोटारीची ये-जा करणे गैरसोईचे ठरते. काही वाहने पाण्यात अडकून पडतात. पायीही जाता येत नसल्याने पादचारी येथून न जाता इतर मार्गांचा अवलंब करतात. बाराही महिने अशी स्थिती असल्याने नागरिक वैतागले होते. या संदर्भात वारंवार तक्रार करून महापालिका प्रशासन दखल घेत नव्हते. पाणी वाहून जाण्यासाठी असलेला मार्गच कॉँक्रिटने बंद केल्याने ही स्थिती निर्माण झाली होती. (प्रतिनिधी)