पिंपरी : खून, मारामाऱ्या, दरोडा या गुन्ह्यांसह पिंपरी-चिंचवड शहरात आत्महत्येच्या घटनाही वाढल्या आहेत. अल्पवयीन मुले, नवविवाहिता, तरुणांच्या आत्महत्येच्या घटना घडत आहेत. आत्महत्या करणारी व्यक्ती विविध कारणांवरून टोकाची भूमिका घेत आहेत. मात्र, अशा घटनांमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळत आहे. प्रत्येक अडचणीमधून मार्ग निघू शकतो, असे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. मात्र, याचा विचार न करता मृत्यूला कवटाळले जात असून, शहरासाठी ही चिंताजनक बाब बनली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी ते आॅक्टोबर दरम्यान घडलेल्या २७ आत्महत्येच्या घटनांमध्ये नवविवाहिता आणि अल्पवयीनांचे प्रमाण अधिक आहे. शहरात जानेवारीपासून अद्यापपर्यंत ६ अल्पवयीनांनी आत्महत्या केली. यामध्ये नऊपासून १७ वर्षांच्या मुलांचा समावेश आहे. १८ ते २२ वयोगटातील सात जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. यामध्ये पाच नवविवाहितांचा समावेश आहे. ठरलेला हुंडा द्यावा, फ्लॅटसाठी माहेराहून पैसे आणावेत आदी कारणांवरून सासरकडून होणाऱ्या छळास कंटाळून विवाहिता आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. अल्पवयीन मुलांच्या आत्महत्येची बाबदेखील गंभीर आहे. लहान मुलांवर कोणत्याही घटनेचा लगेच परिणाम होतो. एखादी गोष्ट पाहिली अथवा ऐकली की, तिचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. टीव्ही आणि मोबाइलच्या वापरामुळे लहान मुलांवर विपरीत परिणाम होत आहेत. एखादी गोष्ट पाहून त्याचे अनुकरण करण्याचा लहान मुलांचा प्रयत्न असतो. ही मुले काय करतात, कोठे जातात, त्यांच्या वागणुकीत काय बदल जाणवतोय का, शाळेत काही त्रास आहे का, अभ्यासामुळे तणावाखाली आहेत का बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, पालकांकडून गांभीर्यपूर्वक लक्ष दिले जात नाही. कामाच्या व्यापात असलेल्या पालकांकडून मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. कामानिमित्त अथवा इतर कारणांमुळे अनेकजण एकत्रित कुटुंबपद्धतीपासून दुरावले आहेत. पूर्वीप्रमाणे एकत्रित कुटुंबपद्धती राहिलेली नाही. यामुळे कुटुंबातील सदस्यांचा संवाद कमी झाला आहे. याचा सर्वांत मोठा परिणाम म्हणजे कुटुंबातील व्यक्ती अडचणीत असल्यास त्याला एखाद्याच्या आधाराची गरज असल्यास ती त्याला प्राप्त होत नाही. आपण एकटे आहोत अशी भावना त्याच्यात निर्माण होते. त्यामुळे तणावाखाली आलेले काहीजण आत्महत्येसारखी टोकाची भूमिका स्वीकारत आहेत.(प्रतिनिधी)
आत्महत्येच्या घटना चिंताजनक
By admin | Published: October 27, 2014 3:29 AM