पिंपरी : कडक उन्हामुळे लोक घरातून बाहेर पडत नसल्याने शहरातील पर्यटनाला फटका बसला आहे. परिणामी महापालिकेला उद्यान विभागाकडून मिळणारे उत्पन्न घटले आहे. सायंकाळी पाचनंतर ऊन उतरल्यावर उद्यानांमध्ये गर्दी होत आहे. निगडीतील दुर्गादेवी उद्यान, संभाजीनगरचे बर्ड व्हली-नौकाविहार, पिंपळे सौदागरचे डायनासोर पार्क, भोसरीचे सहल केंद्र, बोट क्लब या सर्वच ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. एप्रिलच्या मध्यावर सर्व शाळांना सुटी लागली आहे. परंतु यंदाच्या वर्षी मार्चपासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सकाळी नऊपासूनच कडक ऊन लागत आहे. दररोजचे शहराचे तापमान ३९ ते ४१ अंशांच्या दरम्यान राहत आहे. यामुळे लोक घरातून बाहेर पडत नसल्याचे दिसत आहे. स्थानिक रहिवासी, याशिवाय त्यांच्याकडे बाहेरगावाहून सुटीनिमित्त राहायला येणारे लोकही दिवसभर उद्यानांकडे पाठ फिरवत आहेत. सायंकाळच्या वेळेस आपल्या घराजवळील उद्यानात जाण्यासच लोक पसंती देत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १६४ विकसित उद्याने आहेत. नऊ उद्याने विकसनशील आहेत. महापालिकेच्या वतीने नऊ उद्यानांमध्ये प्रवेशशुल्क आकारण्यात येते. यातील सात उद्यानांमध्ये लहान-मुलांसाठी पाच, तर मोठ्यांसाठी १० रुपये शुल्क आकारण्यात येते. यामध्ये निगडीतील दुर्गादेवी उद्यान, भोसरीतील सहल केंद्र, पिंपळे सौदागरचे डायनासोर पार्क, गणेश तलाव, सावरकर उद्यान, गुलाबपुष्प उद्यान, बर्ड व्हॅली यांचा समावेश आहे. शाहूनगर येथील शाहू उद्यान व थेरगावातील लक्ष्मीबाई बारणे उद्यान या दोन उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी रुपया, तर मोठ्यांसाठी दोन रुपये तिकीट घेण्यात येते. पूर्वी सर्वच उद्यानांमध्ये एक-दोन रुपये इतकाच दर होता. मात्र तीन वर्षांपूर्वी त्यात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेला पूर्वी हजारोंच्या संख्येत मिळणारे उत्पन्न आता लाखांत मिळत आहे. (प्रतिनिधी)एक एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या आर्थिक वर्षात महापालिकेला उद्यानांमधून एक कोटी २६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यामध्ये एप्रिल २०१५ला ११ लाख ५८ हजार २१२ रुपये इतके उत्पन्न मिळाले होते. एप्रिल २०१६ ला १० लाख ४७ हजार ५७० रुपये उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीपेक्षा या वर्षी एप्रिल महिन्याच्या उत्पन्नात सुमारे एक लाख दहा हजार रुपयांची घट झाली आहे. मागील वर्षी मे महिन्यात १३ लाख ७२ हजार १२५ रुपये उत्पन्न महापालिकेला मिळाले होते. या वर्षी उन्हामुळे लोकांनी उद्यानांकडे पाठ फिरविल्याने मे महिन्यात उत्पन्न किती मिळेल याकडे उद्यान विभागाचे लक्ष लागून राहिले आहे. उन्हाळ्याच्या सुटीत उद्यानांमध्ये एप्रिल, मे व जून अशी तीन महिने गर्दी असते. पाऊस पडू लागला की, हळूहळू ती कमी होते. पुन्हा दिवाळीच्या सुटीत गर्दी वाढते. नागरिकांनी उद्यानांमध्ये जबाबदारीने वागावे. फुले, पाने तोडू नये. उद्यानातील खेळण्यांची अथवा इतर वस्तूंची मोडतोड करू नये. उन्हामुळे या वर्षी उत्पन्नात थोडी घट असल्याचे जाणवत आहे. सायंकाळनंतर गर्दी होत आहे. मे महिन्यात व दिवाळीच्या सुटीत उद्यान विभागाला सर्वाधिक उत्पन्न मिळते. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवीन खेळणी बसविण्याचे नियोजन आहे. सर्व उद्यानांमध्ये लॅण्ड स्केपिंगवर भर देण्यात आला आहे.- सुरेश साळुंके, मुख्य उद्यान अधीक्षक
पालिकेच्या तिजोरीलाही उन्हाच्या झळा
By admin | Published: May 08, 2016 3:29 AM