पिंपरी चिंचवड : बुलेट ट्रेनऐवजी रेल्वे प्रवासी सेवा सक्षम करा, असे धोरण माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतले होते. बुलेट ट्रेनला विरोध केल्यानेच प्रभूंचे रेल्वे खाते काढून घेतले, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
मुंबई येथील परळ येथे रेल्वे स्थानकावरील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जणांचा मृत्यू झाला. याविषयी पवार यांना विचारले असताना त्यांनी बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर टीका केली. पवार म्हणाले, ‘‘बुलेट ट्रेन कशासाठी आणि कोणासाठी. हा खरा प्रश्न आहे. हजारो कोटींचे प्रकल्प राबविण्यापेक्षा रेल्वे यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्याची गरज आहे. रेल्वे प्रवाशी सेवा चांगली करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात सरकार कमी पडले आहे. रेल्वे सेवेवर ताण येत आहे. त्याचाच परिणाम म्हणजे मुंबईत अपघात झाला. रेल्वे सेवा सक्षम करा. बुलेट ट्रेन असे कोट्यवधींचे प्रकल्प राबवू नका, असे विचार प्रभूंनी मांडले होते. त्यांना मोदींनी दूर करून पियुष गोयलांच्या माध्यमातून प्रकल्प दामटण्याचे काम सुरू केले आहे. याचा फायदा किती लोकांना होणार आहे. त्याचे तिकीट परवडणारे आहे का?’’
मुंबई पोलिसांनी जारी केले हेल्पलाईन क्रमांककेईएम हॉस्पिटल : 022-24107000वेस्टर्न रेल्वे कंट्रोल रूम : 022-23070564, 022-23017379, 022-23635959मुंबई रेल्वे कंट्रोल रूम : 022-23081725ट्रॅफिक हेल्पलाइन व्हॉट्सअॅप नंबर : 8454999999
नेमके काय घडले एलफिन्स्टन ब्रिजवर?सकाळपासूनच मुंबई शहरात कोसळणाऱ्या पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. यावेळी परेल आणि एलफिन्स्टन रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पुलावर प्रचंड गर्दी झाली होती. यादरम्यान पुलावरील पत्र्याचा काही भाग खाली कोसळल्याचे वृत्त समोर आले. मात्र पूल सुरक्षित होता. पण या घटनेदरम्यान प्रवाशांमध्ये पूल पडल्याची अफवा पसरल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि याचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले. नेमका याचसुमारास जोरदार पाऊस पडला आणि अनेक प्रवासी बाहेर न जाता खोळंबले होते. त्यात नवीन येणारी प्रत्येक गाडी हजारो प्रवासी या दोन्ही स्टेशनांवर येत होते. त्यामुळे थोड्याच वेळात या स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. त्यात झालेल्या लहान घटनेमध्ये पूल पडल्याच्या अफवेची भर पडली. काहीजणांनी शॉर्ट सर्किट झाल्याची बोंब ठोकली. या सगळ्याचा विपरीत परिणाम होत प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि चेंगराचेंगरीची तीव्रता वाढली.
अफवांवर विश्वास ठेवू नकाअग्निशमन दल आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. वाहतूक आणि प्रवाशांसाठी हा पूल तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पूल पडल्याच्या किंवा शॉर्ट सर्किटच्या कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
कोट्यवधी खर्च करुन उभारला होता पूलरेल्वे प्रशासनाने परळ येथे कोट्यवधी खर्च करून पादचारी पूल उभारला आहे. हा पूल दादरच्या दिशेला जाणारा आहे. या पुलाचा वापर होणार नाही, त्यामुळे हा पैशांचा अपव्यय ठरेल, अशी प्रतिक्रिया स्थानिकांसह नागरिकांनी दिली होती. मात्र रेल्वे प्रशासनाने नागरिकांच्या प्रतिक्रियांना केराची टोपली दाखवून पूल उभारला. यामुळे मुंबई दिशेकडील पुलावरील प्रत्यक्ष गर्दी जैसे थेच राहिली होती. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला आता तरी जाग येईल का? , असा सवाल संतप्त स्थानिकांकडून विचारण्यात येत आहे.दुर्घटनेतील मृतांची नावेमसूद आलमशुभलता शेट्टीसुजाता शेट्टीश्रद्धा वरपेमीना वरुणकरतेरेसा फर्नांडिसमुकेश मिश्रासचिन कदममयुरेश हळदणकरअंकुश जैस्वालसुरेश जैस्वालज्योतिबा चव्हाणरोहित परबअॅलेक्स कुरियाहिलोनी देढीयाचंदन गणेश सिंहमोहम्मद शकील