मणिधारी मोटर्सचा वाहनविक्री परवाना निलंबित
By Admin | Published: October 10, 2014 06:21 AM2014-10-10T06:21:14+5:302014-10-10T06:21:14+5:30
परमिट नसताना डीलरने रिक्षांची विक्री केल्याचे तसेच अनधिकृतरीत्या सबडीलर नेमल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न
पुणे : परमिट नसताना डीलरने रिक्षांची विक्री केल्याचे तसेच अनधिकृतरीत्या सबडीलर नेमल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाल्याने शहरातील रिक्षांचा प्रमुख डीलर असलेल्या मणिधारी मोटर्सचा वाहनविक्रीचा परवाना ३ महिन्यांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) निलंबित केला आहे. मणिधारी हा शहरातील प्रमुख डीलर असल्याने ३ महिने रिक्षांची विक्री बंद राहणार आहे.
डीलर व आरटीओच्या चुकीमुळे २० रिक्षाचालकांची ४५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाची वाहन निरीक्षकांमार्फत चौकशी करण्यात आली. त्यानंतर नोटीस बजावून डीलरकडून खुलासा घेण्यात आला. चौकशीत डीलरकडून गंभीर चुका झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा वाहनविक्री परवाना ३ महिन्यांसाठी निलंबित करण्याचे आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळीव यांनी काढले.(प्रतिनिधी)