भावांनी घेतली बहिणींच्या रक्षणाची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 01:21 AM2018-08-27T01:21:18+5:302018-08-27T01:21:38+5:30
रक्षाबंधन उत्साहात : मिठाईच्या दुकानांसह बाजारपेठेतही खरेदीसाठी गर्दी, पीएमपी बसही फुल्ल
पिंपरी : भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सण पारंपरिक पद्धतीने रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहात साजरा झाला. लाडक्या भाऊरायाला औक्षण करून राखी बांधण्याची लगबग सकाळपासूनच घरोघरी दिसून येत होती. विवाहित बहिणीच्या घरी भाऊ गेले होते, तर बहीणही भावाकडे आल्या होत्या. त्यामुळे सकाळपासूनच पीएमपी बससह खासगी वाहनांनादेखील मोठी गर्दी होती.
बहिणीला काय भेटवस्तू द्यायची याचे भावाकडून नियोजन सुरू होते. शहरातील विविध मिठाईच्या दुकानामध्ये, तसेच बाजारपेठेत खरेदीची लगबग दिसून आली. शहरात सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. काही संघटनांनी वृक्षाला राखी बांधून वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. काही महिला संघटनांच्या पुढाकाराने देशाच्या सीमेवर रक्षणासाठी तैनात असणाऱ्या जवानांना राख्या पाठविण्यात आल्या. शहरातील विविध पोलीस ठाण्यातही रक्षाबंधन साजरे करण्यात आले. रविवार सुटीचा दिवस असतानाही पोस्टमन काकांची राख्या वेळेवर पोहोचविण्यासाठी लगबग सुरू होती. सोशल मीडियावरही रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. फेसबुकसह व्हॉट्सअॅप स्टेटसवर बहिणीने ओवाळल्याचे, तसेच राखी बांधल्याचे फोटो पाहायला मिळाले. यासह भावा-बहिणीविषयी प्रेम व्यक्त करणाºया गाण्यांचा सोशल मीडियावर मोठा वर्षाव झाला.
संस्कार परिवर्तनाद्वारे विश्वपरिवर्तन
पंपरी : रक्षाबंधनच्या पावन पर्वानिमित्त पवित्र राखी बांधून आपण ईश्वराशी संबंध जोडतो. ईश्वरीय शक्ती व वरदानांची प्राप्ती त्यामुळे होते. परमात्मा शिव सर्व आत्म्यांचा पिता आहे. जीवनाला आध्यात्मिक मूल्यांनी भरपूर करून शांती व शुभ भावनेद्वारे व्यवहारात स्नेह, सहानुभूती, दिव्यता व मधुरता इत्यादी दिव्य गुणांना धारण करून संस्कार परिवर्तनाद्वारे विश्वपरिवर्तनाच्या श्रेष्ठ कार्यात आपण सहयोगी बना, असा ईश्वरीय संदेश पिंपरी सेवाकेंद्र संचालिका ब्रह्माकुमारी सुरेखादीदी यांनी दिला.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय पिंपरी सेवाकेंद्राच्या वतीने पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, मिलिटरी आॅफिस, पोस्ट आॅफिस, विविध रुग्णालये, शाळा, विविध महाविद्यालये, राजकीय प्रतिनिधी इत्यादी ठिकाणी रक्षाबंधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, नगरसेवक संदीप वाघेरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे, सीओडी राकेश कुमार, ब्रिगेडियर नवप्रीत सिंग, विनोद गुरुंग, पोस्टमास्तर अनुप नहाटे, रेल्वे स्टेशन प्रबंधक नरेंद्र ढवळे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे इत्यादी उपस्थित होते. सुरेशा दीदी, सुप्रियादीदी, अपर्णा विटवेकर, पूजा नावानी, अनुष्का डे, शैला देसाई, अनुप पाटील, सरदार पाटील, नीलेश थोरात यांनी आयोजन केले होते.