पिंपरी : पावसाळ्यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करावे. तसेच नालेसफाईची कामेही पावसाळ्यापूर्वी तातडीने पूर्ण करावीत, असे आदेश आयुक्त दिनेश वाघमारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पूर नियंत्रण आपत्ती व्यवस्थापन कृती आराखड्याबाबतची आढावा बैठक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, शहर अभियंता एम. टी. कांबळे, नगररचना विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर, सहायक आयुक्त महेश डोईफोडे, चंद्रकांत खोसे, योगेश कडूसकर, प्रशांत खांडकेकर, भानुदास गायकवाड, दत्तात्रय फुंदे, मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर आदी उपस्थित होते. आयुक्त वाघमारे म्हणाले, ‘‘शहरात विविध कारणांस्तव रस्तेखोदाई करण्यात आली आहे. तरी रस्तेखोदाई झालेल्या भागातील दुरुस्ती ३१ मेपर्यंत पूर्ण करावी. तसेच नाल्यातील गाळ काढल्यानंतर पावसामुळे तो पुन्हा नाल्यात जातो, असे होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. जलनिस्सारण नलिकांची साफसफाई करावी. झाडाच्या फांद्या छाटणीचे काम सुरु करावे, अग्निशामक विभागाकडील वाहनांची व यंत्रांची चाचणी घ्यावी, यासह बोटींची प्रात्यक्षिके घ्यावीत. राष्ट्रीय आपत्कालीन सुरक्षा दलामार्फत महापालिकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबतच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. अग्निशामन अधिकारी किरण गावडे आणि आपत्ती व्यवस्थापन समन्वयक ओमप्रकाश बहिवाल यांनी चित्रफितीद्वारे पूरनियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन कृती आराखड्याबाबत माहिती दिली. (प्रतिनिधी)
धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करा : आयुक्त
By admin | Published: May 08, 2016 3:25 AM