- मंगेश पांडेपिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडूनही निधी दिला जातो. मात्र, सेवा पुरविताना उद्योगनरीला नेहमीच दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचे दिसून येते. गुरुवारी जागतिक महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी एकूण २६ बस सुरू केल्या. मात्र, त्यांपैकी केवळ पाच बस पिंपरी-चिंचवडच्या वाट्याला आल्या आहेत. तसेच, या ‘तेजस्विनी’ बसचे आठपैकी केवळ दोन मार्ग शहरातून जाणार आहेत.पिंपरी-चिंचवडला पुण्याचे जुळे शहर मानले जाते. सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसाठी दोन्ही शहरांत पीएमपीमार्फत सेवा पुरविली जाते. त्या बदल्यात पुणे महापालिकेकडून ६० टक्के, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ४० टक्के निधी दिला जातो. ‘पीएमपी’च्या बसने सध्या दोन्ही शहरालगतच्या परिसरातील दहा लाखांहून अधिक नागरिक रोज प्रवास करतात. दरम्यान, पीएमपीला निधी दिला जात असल्याच्या तुलनेत तरी सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जाते.जागतिक महिला दिनापासून महिलांसाठी खास ३० नवीन बस सुरू करण्यात आल्या आहेत. या बसला ‘तेजस्विनी’ असे नाव देण्यात आले. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २६ बस सुरू झाल्या असून, उद्योगनगरीच्या वाट्याला अवघ्या पाच बस आल्या आहेत. यामध्ये निगडी आगाराला तीन आणि भोसरी आगाराला दिलेल्या दोन बसचा समावेश आहे. एकूण आठ मार्गांवर या बस धावणार आहेत. त्यामध्ये शहरातील केवळ दोनच मार्गांचा समावेश आहे. एका बाजुला उद्योगनगरीचा विस्तार वाढत असताना महिला प्रवाशांना स्वतंत्र बसची आवश्यकता आहे. मात्र, वाढती गरज व प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. सत्ताधारी पक्षातील कारभारी मिळालेल्या बसविषयी समाधान व्यक्त करताना दिसत आहेत.उद्योगनगरीत तेजस्विनीचे दोनच मार्ग४तेजस्विनी बस सुरु केलेल्या मार्गांमध्ये हडपसर ते वारजे माळवाडी, मनपा भवन ते लोहगाव, कोथरूड डेपो ते कात्रज, कात्रज ते शिवाजीनगर स्टेशन , निगडी ते हिंजवडी माण फेज-३, कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, भोसरी ते मनपा, भेकराईनगर ते मनपा या मार्गांचा समावेश आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील केवळ दोनच मार्ग आहेत.अपघातात वाढ४पिंपरी-चिंचवड शहरातील आगारांमध्ये जुन्या बसचा मोठ्या प्रमाणात भरणा आहे. या जुन्याच बस मार्गावर दामटल्या जातात. त्यामुळे बस बंद पडण्यासह अपघाताचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येते. दरम्यान, आगारांना नवीन बस पुरविल्या जात असताना निगडी, पिंपरी, भोसरी या आगारांचाही विचार होणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवाशी करीत आहेत.अनेक मार्ग बंद४पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीचे निगडी, भोसरी आणि पिंपरी असे तीन आगार आहेत. या तीनही आगारांमधून शहरासह लगतच्या भागात विविध मार्गांवर बस धावत असतात. या मार्गांवर प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद असून, पीएमपीला चांगले उत्पन्न मिळत आहे.४असे असतानाही शहरासह लगतच्या गावांना ये-जा करण्यासाठी असणारे अनेक मार्ग काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आले. त्यामुळेप्रवाशांची गैरसोय झाली. देहू-पुणे स्टेशन, मनपा या मार्गावरीलदेखील बस बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रवाशांकडून होत असलेल्या मागणीमुळे त्या पुन्हा सुरू करण्यात आल्या.
तेजस्विनी बस योजना : उद्योगनगरीला केवळ २० टक्के सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 5:58 AM