‘खाकी’तील भावाने आम्हाला दागिना परत मिळवून दिला; महिलांकडून पोलिसांचे तोंडभरून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 09:11 AM2023-01-11T09:11:45+5:302023-01-11T09:11:53+5:30
चोरीला गेलेला आपला दागिना पुन्हा मिळालाचे पाहून काही महिलांना आनंदाश्रू अनावर झाले
पिंपरी : पोलिसांनी विविध गुन्ह्यांमधील जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादी व मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आला. महाराष्ट्र पोलीस रेझिंग डेनिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या निगडी येथील मुख्यालयात मंगळवारी (दि. १०) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ८४ वेगवेगळ्या गुन्ह्यांतील ८४ फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला. चोरीला गेलेला आपला दागिना पुन्हा मिळालाचे पाहून काही महिलांना आनंदाश्रू अनावर झाले. आमच्या सौभाग्याच्या लेण्यासाठी पोलिसांनी तपास केला. खाकीतील भावाने मिळवून दिलेला हा दागिना आमच्यासाठी मौल्यवान आहे, असे म्हणून त्यांनी पोलिसांचे तोंडभरून कौतुक केले.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहीया, अपर आयुक्त डाॅ. संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे, विवेक पाटील, सहायक आयुक्त डाॅ. प्रशांत अमृतकर, उपस्थित होते. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील एकूण ८४ गुन्ह्यांतील ३३ लाख ४३ हजार २४० रुपये किमतीचे ६७९ ग्रॅम ५९० मिलीग्रॅमचे सोन्याचे दागिने व ७३९ ग्रॅम चांदीचे दागिने तसेच दोन लाख ४८ हजार रुपये किमतीचे १५ मोबाईल फोन, २० हजार रुपयांचा एक लॅपटॉप, ५१ लाख ५० हजारांची चारचाकी व दुचाकी अशी एकूण २१ वाहने, सहा लाख ७० हजारांच्या सहा रिक्षा, ३७ लाख ५७ हजार ७६५ रुपयांचे टायर व ट्यूब व दोन लाख २१ हजार १०० रुपयांचा इतर मुद्देमाल, असा एकूण एक कोटी, ४६ लाख ९३ हजार ७०५ रुपये किंमतीचा मुद्देमाल संबंधित मूळ मालकांना पोलीस आयुक्त चौबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पोलीस आयुक्त चौबे म्हणाले, गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करताना पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तपास करावा लागतो. आरोपीस अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करावा लागतो. तपासासाठी परराज्यामध्ये असताना पोलिसांना अत्यंत कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो. तरी सुध्दा पोलीस प्रयत्नांची पराकाष्ठा करून आरोपी व त्याच्या साथीदारांकडून मुद्देमाल हस्तगत करून आणतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांनी आपल्या मालमत्तेचे संरक्षण करावे. तसेच पोलिसांना सहकार्य करावे. पोलीस सदैव नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहेत.