‘त्यांना’ नाही दुष्काळाचे भान
By Admin | Published: May 9, 2016 12:32 AM2016-05-09T00:32:30+5:302016-05-09T00:32:30+5:30
राज्यभरात दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळामुळे नागरिक हैराण आहेत. अशातच पिंपरी-चिंचवड महापालिकेत दौऱ्यावर दौरे सुरू आहेत. आता महापौरांसह १४ जण सिक्कीम दौरा करणार आहेत.
पिंपरी : राज्यभरात दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळामुळे नागरिक हैराण आहेत. अशातच पिंपरी-चिंचवड महापालिकेत दौऱ्यावर दौरे सुरू आहेत. आता महापौरांसह १४ जण सिक्कीम दौरा करणार आहेत. या दौऱ्यासाठी आठ लाख ६३ हजार ८०० रुपये खर्च येणार आहे. अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली करदात्यांच्या लाखो रुपयांची उधळपट्टी होत आहे.
महापालिकेचे दौरे काही नवीन नाहीत. विविध कारणांनी दौरे काढून फिरायला जाण्यासाठी महिना, सहा महिन्यांनी दौरे आयोजित केले जात आहेत. मात्र, या दौऱ्याचा काय फायदा होतो, हे पदाधिकाऱ्यांनाच ठाऊक, अशी स्थिती आहे. फायदा होतो की नाही, हे निश्चित होत नसले, तरी दौऱ्यांवर लाखो रुपये खर्च होतात, ही मात्र वस्तुस्थिती आहे. मात्र, याचे पदाधिकाऱ्यांना कसलेही देणे-घेणे नाही.
महापालिकेच्या महापौरांसह जैवविविधता समिती, विधी समिती, स्थायी समितीमधील काही सदस्यांनी देशातील पहिले सेंद्रीय राज्य म्हणून घोषित झालेल्या सिक्कीम राज्यातील विविध प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी दौऱ्याचे आयोजन केले आहे. दि. ८ ते १३ मे दरम्यान आयोजित दौऱ्यात महापौर शकुंतला धराडे यांच्यासह जैवविविधता, विधी व स्थायी समितीतील काही सदस्य व अतिरिक्त आयुक्त, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता अशा एकूण १४ जणांचा दौऱ्यात समावेश आहे. पाणीटंचाई असताना पदाधिकाऱ्यांना दौरे सुचत आहेत. (प्रतिनिधी)