पिंपरी : खासगी बसमधून एक कोटीचे सोने, हिऱ्यांचे दागिने, रोकड चोरणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशात पकडले. त्यांच्याकडून २५ लाख रुपये किमतीची ७३१ ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे, ११ लाख रुपये किमतीची मोटार असा ३६ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. मुस्ताक समशेर खान (वय ३१), राजेंद्र हरिश्चंद्र सोनी (वय ३८) आणि इस्माईल बाबू खान (वय ३३, तिघे रा. धरमपुरी, जि. धार, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी दीपक पुरुषोत्तमलाल सैनी (वय २४, रा. राणीगंज, सिकंदराबाद, तेलंगणा) हे भवानी एअर लॉजेस्टीक या कुरीयर कंपनीचे सोने, हिऱ्यांचे दागिने व रोख रकमेचे पार्सल हैदराबाद येथून मुंबई येथे खासगी प्रवासी लक्झरी बसने घेऊन जात होते. बस सकाळी चहा व नाष्टा करण्यासाठी देहूरोड - कात्रज बाह्यवळण महामार्गावर पुनावळे येथील हॉटेल न्यू सागर येथे थांबली. त्या वेळी दीपक सैनी हा फ्रेश होण्यासाठी गाडीतून उतरला. त्याने त्याची सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, हिरे व रोख रक्कम असलेली बॅग आसनाखाली ठेवली. चोरट्यांनी बॅगमधील एक कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, हिरे व रोकड ठेवलेली पिशवी चोरून नेली. सैनी यांनी हिंजवडी पोलिसांत फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून आरोपींची ओळख पटवली.
सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा माग पथकाने पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यांना गुन्हेगाराची ओळख पटली. चोरटे मध्यप्रदेशातील इटावा, देवास येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या संयुक्त तपास पथकाने इटावा शहर गाठले. सलग आठ दिवस सापळा रचून, वेशांंतर करुन मुस्ताक खान याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्य दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून २५ लाखांचे ७३१ ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे आणि ११ लाख रुपये किमतीची मोटार असा ३६ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.