पिंपरी-चिंचवड शहरातून चोरट्यांनी पळविल्या एक लाख ४० हजारांच्या दुचाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 07:34 PM2020-01-22T19:34:21+5:302020-01-22T19:35:23+5:30
पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी पाच वाहने चाेरीला गेल्याच्या घटना समाेर आल्या आहेत.
पिंपरी : उद्योगनगरीत वाहन चोरीचे सत्र सुरूच आहेत. दुचाकी चोरीचे पाच गुन्हे मंगळवारी (दि. २१) संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले आहेत. अज्ञात चोरट्यांनी एक लाख ४० हजार रुपयांच्या दुचाकी पळवून नेल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी चोरीचा पहिला प्रकार रहाटणी येथे २३ ते २४ डिसेंबर २०१९ दरम्यान घडला. याप्रकरणी अमोल बाबूराव पेठे (वय ३३, रा. किसन मदने नगर, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पेठे यांनी त्यांची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी २३ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास राहत्या घराजवळ पार्क केली होती. ती दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. वाहनचोरीचा दुसरा प्रकार बाणेर येथे सोमवारी (दि. २०) सकाळी साडेदहा ते रात्री साडेआठच्या दरम्यान घडला. यााप्रकरणी शीतल राजेश उज्जैनकर (वय २८, रा. बाणेर. मूळ रा. अकोला) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शीतल यांनी त्यांची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी बाणेर येथील खासगी कंपनीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने भर दिवसा त्यांची दुचाकी चोरून नेली.
वाहनचोरीचा तिसरा प्रकार चिखली येथे रविवारी (दि. १९) रात्री नऊ ते सोमवारी (दि. २०) सकाळी सहाच्या दरम्यान घडला. याप्रकरणी बाळासाहेब गोपीनाथ आंधळे (वय ३२, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आंधळे यांनी त्यांची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी घरासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा चवथा प्रकार थेरगाव येथे २१ ते २२ डिसेंबर २०१९ दरम्यान घडला. याप्रकरणी उमेश सुरेश पवार (वय ३५, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पवार यांनी त्यांची २५ हजार रुपये किंमतीची दुचाकी राहत्या घरासमोर पार्क केली होती. दुसºया दिवशी सकाळी दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले.
वाहनचोरीचा पाचवा प्रकार पिंपळे गुरव येथे रविवारी (दि. १९) रात्री अकरा ते सोमवारी (दि. २०) सकाळी सहा दरम्यान घडला. याप्रकरणी आकाश अशोक गारगोटे (वय २१, रा. विनायक नगर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आकाश यांनी त्यांची ५० हजार रुपये किंमतीची दुचाकी घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली.