घरफोडी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक; वाकड पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 08:22 PM2021-01-27T20:22:23+5:302021-01-27T20:30:23+5:30
सहा लाख ८७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
पिंपरी : तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, घरफोडीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून सहा लाख ८७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली.
प्रकाश ऊर्फ नानाभाऊ शंकर लंके (वय ४४, रा. विश्रांतवाडी, पुणे), समीर ऊर्फ सलीम महेबूब पैलवान शेख (वय ३९, रा. हिंजवडी) आणि ओंकार बिभिषण काळे (वय १८, रा. विश्रांतवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील पंकज पाटील (रा. वाकड) यांच्या घरी १४ जानेवारी २०२१ रोजी घरफोडी झाली. तांत्रिक तपास करून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच आणखी सहा गुन्हे केल्याचे कबूल केले.
आरोपी प्रकाश लंके हा भारतीय माईनॉरिटीज सुरक्षा महासंघ-नॅशनल पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असल्याचे सांगत आहे. आरोपी लंके याच्यावर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात १६, खडकीत चार, लोणीकंद आणि विमानतळ ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक असे २२ गुन्हे दाखल आहेत. आरोपी समीर शेख याच्यावर लोणावळ्यात दोन तर लोहमार्ग पोलीस ठाण्यात एक असे तीन गुन्हे दाखल आहेत.
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, तपास पथकाचे सहायक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, दीपक कादबाने, कर्मचारी बिभिषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र मारणे, दीपक भोसले, बापूसाहेब धुमाळ, विक्रम जगदाळे, जावेद पठाण, नितीन ढोरजे, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, नितीन गेंगजे, सुरज सुतार, शाम बाबा, सचिन नरूटे, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले, कौंतेय खराडे आणि नूतन कोंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
घरफोडीच्या पैशांतून घेतली दुचाकी
घरफोडी करून मिळालेल्या पैशांतून आरोपींनी दुचाकी खरेदी केली. त्या दुचाकीसह इतर दोन गाड्या अशा तीन दुचाकी, घरफोडीच्या गुन्ह्यातील ११८ ग्रॅम सोन्याचे दागिने, २० हजारांची रोकड, लॅपटॉप, स्मार्ट वॉच, घरगुती साहित्य तसेच घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण सहा लाख ८७ हजार ६५० रुपयांचा ऐवज आरोपींकडून पोलिसांनी जप्त केला. वाकड पोलीस ठाण्यातील पाच, हिंजवडी आणि वडगाव मावळमधील प्रत्येकी एक गुन्हा या कारवाईतून उघडकीस आला आहे.