पिंपरीत अल्पवयीन मुलांना भिक मागायला लावणा-यांविरूद्ध गुन्हा, तीन मुलांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 07:39 PM2018-02-03T19:39:22+5:302018-02-03T19:39:28+5:30
भिक मागण्यासाठी अल्पवयीन मुलांचा उपयोग करून घेणाºया आरोपीविरूद्ध सांगवी पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे
पिंपरी : भिक मागण्यासाठी अल्पवयीन मुलांचा उपयोग करून घेणाºया आरोपीविरूद्ध सांगवी पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या ताब्यातून एक अल्पवयीन मुलगी आणि दोन मुलांची सुटका केली असून त्यांना शासकीय बाल संरक्षण गृहात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप डेअरी रस्त्याजवळ स्वराज देवीलाल बागडिया (वय ३९,रा. मोरवाडी, लालटोपीनगर, मुळचा राजस्थान) हा आरोपी लहान मुलांना भिक मागायला भाग पाडत होता. सांवगी, वाकड, हिंजवडी भागात गस्तीवर असलेल्या पोलिसांना शंका आली. त्यांनी आरोपीस हटकले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, भिक मागण्यासाठी मुलांना बसविल्याचे त्याने सांगितले. या मुलांचा पिता असल्याचे त्याने सांगितले. सामाजिक सुरक्षा विभाग (गुन्हे) शाखेच्या पथकाने तीन अल्पवयीन मुलांची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. सांगवी पोलिसांकडे आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.
अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरिक्षक संजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शितल भालेकर, पोलीस हवालदार तरटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.