रोमहर्षक लढतींनी आखाड्यात रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 03:11 AM2018-04-20T03:11:24+5:302018-04-20T03:11:24+5:30
येथील ग्रामदैवत श्री मुंजोबामहाराज उत्सव-यात्रा उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कुस्तीच्या रोमहर्षक लढतींनी यात्रेतील आखाडा गाजला. महिला मल्लांच्या कुस्त्याही लक्षवेधक ठरल्या.
रहाटणी : येथील ग्रामदैवत श्री मुंजोबामहाराज उत्सव-यात्रा उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कुस्तीच्या रोमहर्षक लढतींनी यात्रेतील आखाडा गाजला. महिला मल्लांच्या कुस्त्याही लक्षवेधक ठरल्या.
पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघातर्फे भव्य राज्यस्तरीय कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला होता. यात राज्यातील व परराज्यांतील नामवंत अशा १२० मल्लांनी सहभाग घेतला. सह्याद्री कुस्ती संकुलाचा (उपमहाराष्ट्र केसरी) राजेंद्र राजमाने व हरियाणाचा जग्गा पैलवान यांच्यात शेवटच्या कुस्तीसाठी लढत झाली. राजेंद्र राजमाने यांनी घिस्सा डावावर हरियाणाच्या जग्गा पैलवान यास अवघ्या तीन मिनिटांत चितपट करत रोख बक्षीस रुपये एक लाख व चांदीची गदा, तसेच ‘पिंपळे सौदागर किताब २०१८’ हा बहुमान मिळविला. यासह अनेक कुस्तीगीरांनी चितथरारक कुस्त्या पार पडल्या. पैलवान अर्जुन काटे यांच्या वतीने विजेत्या पैलवानास चांदीची गदा देण्यात आली.
शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, वस्ताद किसन लांडगे , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, संतोष बारणे, माजी पीसीएमटी सभापती दिलीप बालवडकर, पोलीस पाटील भगवान काटे पाटील, भरत कुंजीर, जयवंत बोडके, राजू काटे, संदीप काटे, चंद्रकांत कुटे, नामदेव आव्हाळे आदी या वेळी उपस्थित होते. आयोजन श्री मुंजोबामहाराज उत्सव कमिटी व अध्यक्ष सुरेश काटे, समस्त ग्रामस्थ पिंपळे सौदागर व नगरसेवक नाना काटे यांनी केले.
श्री मुंजोबा महाराजांच्या मूर्तीवर सकाळी सातला अभिषेक करण्यात आला. अकराला गावातील सर्व देवतांना ढोल-ताशाच्या निनादात पानफुल वाहण्यात आले. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आभिवादन करण्यात आले. रात्री श्री मुंजोबा महाराज पालखी मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात, भक्तिमय वातावरणात गाव प्रदक्षिणा घालत पालखी मिरवणूक मुख्य मंदिरात परत आली. रात्री ‘लावणी नखऱ्याची’ हा मनोरंजनपर कार्यक्रम पार पडला.
पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने राज्यस्तरीय कुस्ती आखाडा भरविण्यात आला होता. या वेळी वजनी गटावर व खुल्या गटात कुस्त्या घेण्यात आल्या. ३५ किलो, ४० किलो, ४५ किलो, ५० किलो, ५५ किलो, ६० किलो, ६५ किलो, ७४ किलो व खुल्या गटात अशा कुस्त्या झाल्या. सर्व गटांत १२० मल्लांनी सहभाग घेतला होता. सर्व कुस्त्या निकाली खेळविण्यात आल्या. विशेष म्हणजे पराभूत मल्लांनाही बक्षीस देण्यात आले. शेवटची कुस्ती राजेंद्र राजमाने व जग्गा पैलवान यांच्यात झाली. अवघ्या तीन मिनिटांत ही कुस्ती झाली. मात्र शेवटी परीक्षकांच्या नजरेची पापणी लवण्याच्या आत राजेंद्र राजमाने याने हरियाणाच्या जग्गा पैलवान याला चितपट करत अस्मान दाखविले व उपस्थितांचे मन जिंकले.
या आखाड्यात महिला पैलवान अक्षदा वाळुंज हिने पैलवान श्रद्धा भोर हिला कलाजंग डावावर चितपट केले. रितू संधू व तनुजा आल्हाट यांची कुस्ती प्रेक्षणीय झाली महिला पैलवानांना नगरसेविका शीतल काटे, स्वाती शिवाजी काटे व अनिता संदीप काटे यांनी बक्षिसे दिली. या आखाड्यासाठी पंच म्हणून बाळासाहेब काळजे, सचिन खांदव, निवृत्ती काकडे, संतोष माचुत्रे, काळुराम कवितके तर हंगेश्वर धायगुडे यांनी निवेदक म्हणून कामगिरी पार पाडली.
राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता पैलवान राहुल आवारे यांचा पिंपरी- चिंचवड शहरात पहिल्यांदाच पिंपळे सौदागर ग्रामस्थांतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान कौतुक डाफळे, ज्ञानेश्वर गोचडे, आकाश माने, महाराष्ट्र केसरी मुन्नालाल शेख, नाथा पारगावकर, दशरद पवार व युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते यांना सन्मानित करण्यात आले.