वाहतूक शिस्त ‘सीसीटीव्ही’ भरोसे
By admin | Published: October 2, 2015 12:59 AM2015-10-02T00:59:28+5:302015-10-02T00:59:28+5:30
शहरातील वाहतूक नियमनाचे बारा वाजले असून, नो एंट्री, सिग्नल तोडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही
पिंपरी : शहरातील वाहतूक नियमनाचे बारा वाजले असून, नो एंट्री, सिग्नल तोडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. त्यांचा कारभार सीसीटीव्हीभरोसे झाला आहे. दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा चालकांना अडवून माया कशी गोळा करता येईल, याकडे प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. नो एंट्रीतून वाहने दामटली जात असताना पोलीस त्याकडे काणाडोळा करीत असल्याचे चित्र ‘लोकमत’ टीमने बुधवारी व गुरुवारी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मधून समोर आले.
‘लोकमत’च्या टीमने शहरातील प्रमुख रस्ते, चौकांमध्ये दिनांक ३० सप्टेंबर आणि १ आॅक्टोबर या दिवशी सकाळी दहा ते दुपारी साडेबारा या वेळेत स्टिंग आॅपरेशन केले. वाहतूक पोलिसांचा कारभार सीसीटीव्हीभरोसे असल्याचे दिसून आले. ‘कायद्याची’पेक्षा ‘काय द्याचं बोला’ ही भाषा वाहतूक पोलीस करीत असल्याचे दिसून आले.
मोरवाडी पिंपरी
सकाळी ११.२५ ते दुपारी ११.५०
पिंपरी, मोरवाडी चौकात हॉटेल सुप्रीमच्या बाजूने वाहतूक पोलीस उभे असतात. ते तिथे असतानाही एम्पायर इस्टेटजवळील पेट्रोल पंपाच्या दिशेने मोरवाडी चौकात वाहने येतात. ‘लोकमत’चा प्रतिनिधी मोरवाडीतून एम्पायर इस्टेटपासून मागे वळून दुचाकी घेऊन विरुद्ध दिशेने मोरवाडी चौकाकडे आला. त्या वेळी दोन वाहतूक पोलीस आणि एक वॉर्डन मोरवाडीतून चिंचवड स्टेशनला जाणाऱ्या एका चारचाकी वाहनचालकाशी वाद घालताना दिसले. हा वाद सुमारे पंधरा मिनिटे सुरू होता. पोलिसांनी चालकाच्या हातात पावती टेकविली, तरी वाद सुरूच होता. या ठिकाणी तिघेही जण एकाच बाजूची वाहने सिग्नल तोडतात की नाही, कोण सिग्नल तोडतेय, हे पाहत होते. तर पेट्रोल पंपाकडून येणारी वाहने या पोलिसांसमोरून जात असताना ते त्यांना हटकत नव्हते. लोकमतचा प्रतिनिधी त्यांच्या समोरून गेला, तरी पोलिसांनी त्यांना हटकले नाही.
आकुर्डी खंडोबामाळ चौक : सकाळी ११.४० ते दुपारी १२.२०
आकुर्डी खंडोबामाळ चौकात सरस्वती शाळेसमोरच पोलीस उभे होते. या चौकात स्टार बाजारकडून खंडोबामाळ चौकात येण्यास बंदी आहे. सरस्वती शाळेसमोरील चौकात रस्त्याच्या उजव्या बाजूला पोलीस कर्मचारी उभे होते. थरमॅक्स चौकाकडून व आकुर्डी गावठाणातून महामार्गावर सिग्नल तोडून येणाऱ्यांना हे पोलीस पकडत होते. काळभोरनगरच्या बाजूने आकुर्डीकडे विरुद्ध दिशेने निघाले. अगदी पोलिसांच्या जवळून जातानाही हटकले नाही.
-----
१) वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शहरातील प्रमुख चौकांत वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली आहे. मात्र, हे पोलीस वाहतूक नियमनापेक्षा वसुलीकडे लक्ष देत असल्याचे उघड झाले.
२) दिलेल्या पॉइंटवर उभे राहून दुसऱ्या रस्त्यावरून चुकीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे आढळून आले.
३) पोलिसांसमोर नो एंट्रीतून किंवा सिग्नल तोडून जात असताना कोणीही हटकले नाही. पोलिसांची सजगता कमी असल्याचे दिसून आले.
४) लोकमतने पाहणी केलेल्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. पोलिसांचा कारभार सीसीटीव्हीवरच अवलंबून असल्याचे दिसून आले.
-----
एचए ते वल्लभनगर अंडरपास
वेळ : ११.२० ते ११.३०
पुणे-मुंबई महामार्गाहून एचए कंपनीच्या समोरून वल्लभनगरला जायचे झाल्यास पिंपरी चौकातून वळसा घालून किंवा एचएसमोरील अंडरपासमधून जावे लागते. मात्र, साई चौकातून महामार्गावर येण्यासाठी असणाऱ्या रस्त्याने वल्लभनगरकडे जाण्यास बंदी आहे. मात्र, या रस्त्याने पुण्याच्या दिशेने उलटी वाहने जाताना दिसली. दुचाकी आणि चारचाकी वाहने पिंपरीकडून वल्लभनगर अंडरपासकडे जाताना दिसत होती. या वेळी एक रुग्णवाहिकाही या रस्त्याने जाताना दिसली. अशाच पद्धतीने या अंडरपासमधून शंकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहने जात होती.
इंदिरा गांधी उड्डाणपूल, पिंपरी
वेळ : सकाळी ११.०० ते ११.२०
पिंपरी साई चौकातून उड्डाणपुलावर येण्यास बंदी आहे, तसेच पुलावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उडाणपुलावर दोन वाहतूक पोलीस उपस्थित होते. त्यापैकी एक जण मोरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, तर एक जण चौकातील रिक्षामध्ये बसलेला होता. त्यांच्या समोरच पिंपरीतील साई चौकातून नो एंट्रीतून लोकमत प्रतिनिधी दुचाकीने उड्डाणपुलाकडे आले. शगुन चौकातही हटकले नाही. तेथून उड्डाणपुलावर आलो. पोलीस ज्या रिक्षात बसले होते, तेथून पुढे गेल्यानंतरही त्या पोलिसांनी हटकले नाही. असे दोनदा केले, तरी कोणाचेही लक्ष गेले नाही.
चिंचवड स्टेशन चौक
वेळ सकाळी १०.३० ते ११.१४
चिंचवड स्टेशन चौकात चिंचवड गावातून महामार्गावर येणाऱ्या वळणावर वाहतूक पोलिसांचा तपासणी पॉइंट आहे. तिथे पाच कर्मचारी एकाच जागेवर उभे असल्याचे दिसून आले. पेट्रोल पंपापासून पोस्ट कार्यालयाकडे जाण्यास बंदी आहे. तसेच, चौकातून बिग बाजारच्या बाजूने एम्पायर इस्टेटकडे जाण्यासही बंदी आहे. मात्र, पोलिसांच्या समोरच या दोन्ही रस्त्याने वाहने नो एंट्रीतून जात असताना वाहतूक पोलीस मात्र चिंचवडगावातून महामार्गावर सिग्नल तोडून येणाऱ्यांना पकडत होते. दुसऱ्या दोन रस्त्यांवर त्यांचे अजिबात लक्ष नसल्याचे दिसून आले.
पोलीसच तोडताहेत वाहतुकीचे नियम
चिंचवड स्टेशन चौकातून निरामय रुग्णालयाकडे जाण्यास बंदी आहे. मात्र, येथे कधीही वाहतूक पोलीस उभा राहिलेला दिसत नाही. या रस्त्यावर डाव्या हाताला पोलीस वसाहत आहे. चौकातून पोलीस वसाहतीकडे जाता येत नाही. पोस्ट आॅफिससमोर ‘लोकमत’चे प्रतिनिधी उभे असताना त्यांच्या समोरूनच पेट्राल पंपावरून विरुद्ध दिशेने सकाळी सव्वाअकराच्या सुमारासास चक्क एक पोलीस दुचाकीवरून आला आणि पोलीस वसाहतीकडे गेला. त्यांच्या वाहनाचा क्रमांक होता एमएच १४ ईडी ४४४७.