अनिल पवळ पिंपरी : उद्योगनगरी म्हणून लौकि क पावलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात नोटाबंदीच्या निर्णयानंतर थंड पडलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाला काही महिन्यांपासून थोडी गती मिळाली असताना आता पुन्हा वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) फटका बसला आहे. गत एका महिन्यात सुमारे दीड हजार कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्योगनगरी म्हणून पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आहे. या शहरात हजारो कंपन्यांमधून विविध प्रकारची उत्पादने बाजारात आणली जातात. ही उत्पादने विविध शहरांत, राज्याबाहेर पाठवायची असल्याने ट्रान्सपोर्ट व्यवसायही मोठ्या प्रमाणावर चालतो. पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवसायातून सुमारे १० हजार कोटींची उलाढाल होत असते.एक जुलैपासून देशभरात वस्तू व सेवाकर लागू करण्यात आला. त्यात प्रथमच कापडावर जीएसटी लावण्यात आला. याशिवाय लोखंड, ब्रॅण्डेड धान्यासह इतरही वस्तूंवर कराच्या टक्केवारीत वाढ केली. त्यामुळे बहुतांश व्यापाºयांनी कोणताही नवीन माल खरेदी करण्याची घाई केली नाही. व्यापाºयांमध्ये अद्यापही या कराबद्दल संभ्रमाची स्थिती असल्याने बाजारात ग्राहकांची वर्दळ मंदावली आहे. त्यामुळे बाजारात मालाची टंचाई जाणवू लागली असून, त्याचा सर्वाधिक फटका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना बसला आहे.पिंपरी-चिंचवड शहरातून गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह इतर राज्यांमध्ये मोठा व्यवसाय होतो. मात्र, व्यापारीच माल खरेदी करीत नसल्याने ट्रक व्यवसाय थंडावला आहे. गेल्या एक महिन्याच्या कालावधीत दीड हजार कोटींच्या व्यवसायाला ब्रेक लागला आहे. परिणामी, ट्रान्सपोर्ट व्यवसायातील कामगार, चालक आणि वाहकांचे हात रिकामे आहेत. ट्रान्सपोर्ट व्यवसाय ७० टक्के प्रभावित झाल्याने शहरातील निगडी येथील ट्रान्सपोर्टनगरी, भोसरी, संतनगर भागात ट्रकच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत.शहरातील अनेक छोट्या कंपन्यांनी जीएसटीमुळे गेल्या काही महिन्यांपासूनच उत्पादनात घट केली होती. जुन्या मालाची विक्री करून नवा माल नव्या दराने विक्रीसाठी सर्व प्रतीक्षेत आहेत. डिस्ट्रिब्युटर बाजारात माल पाठवीत असला, तरी छोट्या व्यापाºयांनी अद्याप जीएसटीचा नंबर घेतलेला नाही. त्यांनी नवा माल खरेदी करणेच बंद केले आहे. कंपन्यांमधून निघालेला माल ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास २० दिवस लागतात. विस्कळीत झालेली साखळी पूर्वस्थितीत येण्यासाठी किमान महिना लागेल, असे व्यावसायिक म्हणतात.शहरात लहान व्यावसायिकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या व्यवसायामुळे तीनचाकी, चारचाकी छोट्या मालवाहतूक करणाºया वाहनांना मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचे काम उपलब्ध होते. मात्र, जीएसटीसाठी आवश्यक असणारी नोंदणी अद्याप छोट्या व्यावसायिकांनी केली नाही. त्यामुळे त्यांनाही वाहतुकीची कामे नाहीत. वाहनतळावर धंद्याअभावी वाहने उभी आहेत. रोजच्या व्यवसायावर रोजीरोटी चालते. एकाएकी कामच मंदावले आहे. त्यामुळे घर खर्च आणि गाडीचे हप्ते फेडायचे कसे, ही विवंचना वाहनचालकांना सतावत आहे.
‘ट्रान्सपोर्ट’ला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 5:59 AM