वाहतूक पोलिसांची सुरक्षा रामभरोसे, महापालिकेसह शासनही उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 03:21 AM2018-04-21T03:21:43+5:302018-04-21T03:21:43+5:30
ऊन, वारा, पाऊस यांची कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून रात्री अपरात्री काम करण्याची तयारी ठेवणारे वाहतूक पोलीस, मात्र कर्तव्य बजावीत असताना अनेक अडचणींना सामोरे जात आहेत.
रहाटणी : ऊन, वारा, पाऊस यांची कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून रात्री अपरात्री काम करण्याची तयारी ठेवणारे वाहतूक पोलीस, मात्र कर्तव्य बजावीत असताना अनेक अडचणींना सामोरे जात आहेत. जीव मुठीत धरून चौकात उभे रहावे लागत आहे. रोजच वाढती वाहतूक, अपुरे मनुष्यबळ, त्यात बारा तास काम, असे एक ना अनेक समस्या वाहतूक पोलिसांच्या दिसून येत आहेत. मायबाप सरकारला त्यांच्याकडे पहाण्यास वेळ नाही. आई जेवण देईना, बाप भिक मागू देईना, अशी परिस्थिती झाल्याने वाहतूक पोलिसांना होणारा त्रास सहन करावा लागत आहे.
रहाटणी, काळेवाडी व पिंपळे सौदागर परिसरातील बीआरटीएस अंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. त्यासाठी वाहतूक पोलिसांवर त्याचा काय परिणाम होईल याचा साधा विचारही महापालिका प्रशासनाने केला नसल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी खोदकाम करताना वाहतुकीच्या समस्येचा विचार करण्यात येत नाही. कोणत्याही मार्गाने वाहतूक वळविण्यात येते. वाहतुकीचे नियोजन करताना पोलिसांवर कोणत्या प्रकारचा ताण येणार याचा विचार होत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र वाहतूककोंडी झाली की, सर्व दोष वाहतूक पोलिसांना. खरे तर बीआरटीएस रस्त्यावरील अनेक चौक ५० ते ५५ मीटर पेक्षा जास्त रुंदीचे झाले आहेत. मुळात नियमानुसार रस्ता ३५ मीटर रुंदीचा असला पाहिजे. याला खऱ्या अर्थाने प्रशासनाकडून खो देण्यात आला आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून चौकांचे रुंदीकरण झाल्याने वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.
पूर्वी वाहतूक पोलिसांना चौकात उभे राहाण्यासाठी स्वतंत्र निवाºयाची अर्थात कॅबिनची व्यवस्था असे. त्यामुळे थोडीतरी ऊन, वारा, पाऊस यापासून सुरक्षा होती. सध्या ते पण नाही. ऊन, वारा, पावसात उघड्या आभाळाखाली उभे राहून कर्तव्य बजवावे लागत आहे. रहाटणी येथील साई चौकाचे रुंदीकरण झाल्याने व चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने चौकाच्या चारही बाजूने उभे राहून वाहतूक नियमन करावे लागत आहे. पोलिसांना आपला जीव मुठीत धरून उन्हात उभे रहावे लागते, त्यांच्यासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था दिसून येत नाही.
वाहतूक पेलिसांना मानसिक ताणतणाव
वाहनांची संख्या वाढत आहे. त्यात प्रदूषणाची भर पडत आहे. या प्रदूषणापासून वाहतूक पोलिसांचा बचाव व्हावा म्हणून प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा उपाय केल्याचे दिसून येत नाही. वाहनावर जाताना प्रदूषणापासून बचाव व्हावा म्हणून अनेक जण तोंडाला मास्क, रुमाल बांदताना दिसतात़ मात्र वहातूक पोलीस दररोज दहातास प्रदूषणात उभा आसतो तरी शहारातील एकही जागरूक नागरिक, सामाजिक संघटना यावर आवाज उठवीत नाही किंवा संबंधित प्रशासन यावर ठोस उपाय करताना दिसून येत नसल्याने वाहतूक पोलिसांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. याला जबाबदार कोण हा खरा प्रश्न आहे.
प्रदूषणामुळे आरोग्याला फटका
बहुतांश वाहतूक पोलीस वाढत्या प्रदूषणामुळे दमा, खोकला अशा आजारांनी बाधित आहेत. त्यांना प्रदूषणपासून बचावासाठी सरकार दरबारी कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे. ऊन, वारा, पाऊस यापासूनही वाहतूक पोलिसांना बचाव होण्यासाठी चौकामध्ये योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
स्वच्छतागृह नसल्याने कुचंबणा
शहरातील बहुतांश ठिकाणच्या चौकात स्वच्छतागृहसुद्धा नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. साई चौक, काळेवाडी फाटा, तापकीर चौक, शिवार चौक, कोकणे चौक अशा मोठ्या चौकांमध्ये स्वच्छातागृहांविना पोलिसांची कुचंबणा होत आहे. बहुतांशवेळा चौकाशेजारील एखाद्या दुकानाचा किंवा हॉटेलचा आधार त्यांना घ्यावा लागतो.
राजकीय दबावाचा वापर
वाहतूक पोलीस वाहतूक नियमन करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. मात्र बहुतांश वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. अशा बेशिस्त वाहनचालकांना दंड आकारताना वाहतूक पोलिसांवर राजकीय दबाव टाकण्यात येतो. त्यासाठी संबंधित बेशिस्त वाहनचालक राजकीय पदाधिकाºयांना फोन करून वाहतूक पोलिसांवर दबाव टाकतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांना मानसिक ताणतणावालाही सामोरे जावे लागते. विना परवाना वाहन चालविणे, नियमाचे उल्लंघन करणे आणि त्यासाठी दंड झालाच तर पोलिसांनाच बदनाम करण्याचे प्रकार बेशिस्त वाहनचालकांकडून होतात.