मुंबई-पुणे रस्त्यावरील संघवी क्रेनजवळ भीषण अपघात; २ ठार, ५ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:36 AM2018-01-10T11:36:32+5:302018-01-10T13:37:27+5:30
मुंबई-पुणे रस्त्यावर विनोदेवाडी (साते) संघवी क्रेनजवळ कंटेनर आणि डस्टर या दोन वाहनांच्या भीषण अपघातात दोन जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (बुधवार, दि. १०) सकाळी ६च्या दरम्यान हा अपघात झाला.
वडगाव मावळ : मुंबई-पुणे रस्त्यावर विनोदेवाडी (साते) संघवी क्रेनजवळ कंटेनर आणि डस्टर या दोन वाहनांच्या भीषण अपघातात दोन जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (बुधवार, दि. १०) सकाळी ६च्या दरम्यान हा अपघात झाला.
राकेश दक्षणामूर्ती नायडू (वय २५, रा. एनडीए, मनीषा थिएटर मागे, शिवणे, पुणे) राहुल दत्तात्रय नागरगोजे (वय २३, रा. केशवनगर, मुंढवा, मूळ रा. दवणगाव, ता. रेणापूर, जि. लातूर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. राजेंद्र चांगोत्रे (वय २३, रा. एनडीए, खडकवासला), दिपांशू भारद्वाज (वय २५, रा. वाकड), अमनसिंह (वय २३, रा. लवासा, पुणे), रविकुमार प्रेमसिंग (वय २४, रा. वारजे), कंटेनर चालक लालचंद्र यादव (रा. उत्तर प्रदेश) अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एम एच १४ एफ एम ७२६१ क्रमांकाच्या कारमधून राहुल नागरगोजे, राकेश नायडू, राजेंद्र चांगोत्रे, दिपांशू भारद्वाज, अमनसिंह, रविकुमार प्रेमसिंग हे पुणे बाजूला सुसाट निघाले असताना त्यांच्या कारचे नियंत्रण सुटल्याने पुणे बाजूला जाणाऱ्या एम एच ४३ इ ६५८६ कंटेनरला पाठीमागून जोरात धडक बसली.
या अपघातात राकेश नायडू व राहुल नागरगोजे यांचा जागीच मृत्यू झाला तर यात कारमधील चौघांसह कंटेनर चालक जखमी झाले असून त्यांच्यावर सोमाटणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींना वडगाव पोलीस व रुग्णवाहिका चालक मिलिंद नवाडे यांनी जखमींना वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. अपघाताचा तपास पोलीस हवालदार राजेश कर्डिले करत आहे.
धोकादायक वळण
विनोदेवाडी हद्दीत संघवी क्रेनजवळ धोकादायक वळण असल्याने त्या ठिकाणी वारंवार अपघात होऊन बळीच्या संख्येत वाढ होत आहे. १ ते १० जानेवारी दरम्यान तीन भीषण अपघात झाले यात ४ जण मृत्यूमुखी पडले तर ८ जण जखमी झाले होते. या धोकादायक वळणाबाबत आयआरबी तात्पुरती दुरुस्ती करत असून सध्या महामार्गावरील दुभाजक दुरुस्तीच्या नावावर काढून टाकले असून सुसाट वाहने अचानक एकामार्गावरून दुसऱ्या मार्गावर आल्याने अपघात होत आहे. वडगाव येथील सेवा रस्त्याचे काम धिम्यागतीने सुरू असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
महामार्गाच्या बळींना जबाबदार कोण?
आयआरबी महामार्गावर टोल वसुलीचे काम करत असून महामार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.