कंपनीतही घडू लागले मारहाणीचे प्रकार, कामात चुका काढल्याने तिघांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2021 01:24 PM2021-05-02T13:24:32+5:302021-05-02T13:24:38+5:30
पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
पिंपरी: रस्त्यावर किरकोळ वादातून भांडणे होत असतात. त्यातून अनेकदा मारहाणीचे प्रकारही घडतात. पण आता कंपनीत किरकोळ वादातूनही थेट मारहाण होण्याच्या घटना समोर येऊ लागली आहेत. पिंपरीत एका कंपनीत कामात चुका काढल्याने कंपनीतील तिघांना मारहाण केली. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रोफर्स कंपनी, मॅगझीन चौक, दिघी येथे बुधवारी सायंकाळी सात ते रात्री आठच्या दरम्यान ही घटना घडली.
कार्तिक संजय वानखेडे (वय १९, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली आहे. शुभम दिलीप पवार (वय १८), निरंजन दिलीप पवार (वय २०), दिलीप पवार (वय ५०), संतोष पवार (वय ३०), विजय पवार (वय २८, रा. दिघी), अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रोफर्स कंपनीमधील कामगार मिलिंद गोविंद नवसागर याने शुभम पवार याच्या कंपनीमधील कामांमध्ये चुका काढल्या. याचा राग मनात धरून शुभम व निरंजन यांनी मिलिंद यांना शिवीगाळ केली. शिवीगाळ करू नका, असे वानखेडे व कामगार दीपक यांनी सांगितले. त्यानंतर आरोपी कंपनीच्या बाहेर गेले. त्यानंतर अन्य लोकांना कंपनीमध्ये घेऊन आले. आरोपींनी कंपनीत बेकायदेशीर जमाव जमवला. तसेच कंपनीतील कामगार मिलिंद नवसागर व दीपक कांबळे आणि वानखेडे यांना हाताने मारहाण केली.