पिंपरी : पवना धरणाच्या चहूबाजूला ग्रामीण पर्यटन विकासाच्या नावाखाली कॅम्प साईटने विळखा घातला आहे. पाटबंधारे विभागाची कसलीही परवानगी नसताना पवना प्रोजेक्टच्या जागांवर सदर कॅम्प साईट अवैधपणे चालविल्या जात आहेत. येथे अवैैधधंदे मोठ्याप्रमाणात सुरू आहे.
निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या मावळ तालुक्यातील पवना धरणाचा परिसर कायमच पर्यटकांना भुरळ घालतो. परिसरातील लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा हे किल्ले व परिसरातील हिरवागार व शांत परिसर पर्यटकांचा कायमच आकर्षणाचा राहिला आहे. याचाच फायदा घेत या भागातील काही युवकांनी धरणाच्या चहूबाजूला ग्रामीण पर्यटनाच्या नावाखाली मोकळ्या जागांवर कॅम्प साईट तयार केल्या. पर्यटकांना राहण्यासाठी निवारा व जेवणाची सोय केली. काही काळ योग्य प्रकारे व्यवसाय केल्यानंतर या कॅम्प साईटवर पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता दारू तसेच हुक्का पुरविणे, शांततेचा भंग करत मोठ्या आवाजात साऊंड सिस्टम लावत रात्र जागवत ग्रामस्थांना त्रास देण्याचे प्रकार सुरू केले आहेत. सोमवारी रात्री याच व्यावसायिक रस्सीखेचेतून हाणामारी व वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.
यापूर्वी देखील कॅम्प साईटवरच्या वादातून खुनाची घटना घडली होती. तसेच मद्यप्राशन करून धरणाच्या पाण्यात उतरलेल्या पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर मागील वर्षी वन विभागाचा एक अधिकारी लाच घेताना पकडला गेला होता. काही कॅम्पधारकांनी पाटबंधारे विभागाची कोणतीही परवानगी न घेता धरणाच्या पाण्यात बोटी सोडल्या आहेत. पर्यटकांकडून बक्कळ पैसे घेऊन त्यांना पाण्यातून फिरवून आणले जाते. व्यावसायिक कारणांकरिता धरणात कोणालाही बोटिंग साईट तसेच पवना प्रोजेक्टच्या जागेवर कॅम्प लावण्यासाठी पाटबंधारे विभागाने परवानगी दिलेली नसल्याची माहिती उपअभियंता मठकरी यांनी दिली. स्थानिकांवर आजपर्यंत पाटबंधारे विभागाने कारवाई केली नसली तरी सध्या या कॅम्प साईटवर सुरू असलेल्या प्रकारांमुळे चुकीच्या प्रकारांना पाठबळ मिळू लागले आहे.
तसेच निसर्गाची हानी व सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याने सर्व कॅम्पधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. लवकरच या सर्वांवर कारवाई केली जाणार आहे. स्थानिक युवकांनी ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून सुरू केलेल्या व्यवसायांचे सर्व स्तरांमधून सुरुवातीच्या काळात कौतुक केले जात होते. मात्र सध्याची कॅम्प साईटची परिस्थिती पाहता कॅम्प साईट दारूचे अड्डे बनू लागले आहेत. जेवणाच्या सोबत येथे पर्यटकांना मोठ्या प्रमाणात दारू, हुक्का यासारखे पदार्थ परविले जाऊ लागले आहेत. भविष्यात घडणाऱ्या चुकीच्या घटना रोखण्याकरिता आजच त्यांच्यावर कारवाई करत ते बंद करणे योग्य ठरणार आहे.
सुरू असलेल्या सर्व साईट पवना प्रोजेक्टच्या जागेवर सुरू असल्याने त्यांच्यावर कारवाई करत त्या जागा मोकळ्या करून घेण्याकरिता वरिष्ठ स्तरांवर हालचाली व पत्र व्यवहार सुरू करण्यात आले आहेत.