पिंपरी : शहरातील अनेक प्रभागात महापालिकेची मान्यता नसतानाही खासगी बालवाड्या सुरू आहेत. नगरसेवकांच्या आग्रहास्तव विविध भागात सात ते आठ बालवाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. दोन वर्षांनंतरही या बालवाड्यांना मान्यता नाही. त्यामुळे शिक्षकांचे मानधन व विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरसेवकांच्या दबावामुळे शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मान्यतेने शहरात सुमारे २०८ बालवाड्या कार्यरत आहेत. याशिवाय कुदळवाडी, जाधववाडी, पिंपरीनगर, ंिचखली, अजंठानगर, भाटनगर व रुपीनगर या परिसरात नगरसेवकांच्या आग्रहामुळे काही खासगी स्वरूपात बालवाड्या सुरू आहेत. काही बालवाड्यांना दोन ते पाच वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. मात्र, आजअखेर महापालिकेच्या शिक्षण मंडळ प्रशासनाने या बालवाड्यांना मान्यता दिलेली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून शिक्षिकांना मानधन व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा लाभ मिळालेला नाही. खासगी बालवाडीचा येणारा खर्च नगरसेवक व शिक्षिका स्वखर्चातून करतात. यामध्ये खोलीचे भाडे, शैक्षणिक साहित्य आदी गोष्टींचा समावेश आहे. यातील काही बालवाड्या मनपाच्याच शाळेत भरतात. (प्रतिनिधी)
मान्यताविना बालवाड्या
By admin | Published: December 24, 2016 12:36 AM