'तिने' नाही तर 'त्याने' केली वडाची पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 08:21 PM2018-06-27T20:21:06+5:302018-06-27T20:26:22+5:30
सत्यवानाला साक्षात यमाच्या दारातून परत आणणाºया सावित्रीच्या त्यागाची व पतिव्रतेचे महत्त्व असलेल्या वटसावित्री पौर्णिमेस विशेष महत्त्व आहे.
सांगवी : पारंपरिक रूढी व चालीरीतींना फाटा देत सांगवीतील मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेच्या वतीने पुरुषांनी वटपौर्णिमा साजरी केली. पिंपळे गुरव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वडाच्या झाडाचे पूजन करून आणि त्याला सुती धागा बांधून सात फेऱ्या मारत पुरुषांनी स्त्री समानतेचा संदेश दिला. संस्थेच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत असून, खास महिलांच्या पारंपरिक सणात पुरुषांनी सहभाग घेतल्याने सदर कार्यक्रमास एक विशेष महत्त्व आल्याचे नागरिकांनी या वेळी मत व्यक्त केले.
आधुनिक युगात स्त्री व पुरुष प्रत्येक क्षेत्रात सोबतीने खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक ठिकाणी सोबत असल्याने महिलांनीच का प्रत्येक जन्मी तोच नवरा मिळावा म्हणून पूजन करावे तर पुरुषांनीही यासाठी वडाच्या झाडाचे पूजन केले तर ती खरी समानता होईल. नेमकी ही भावना समोर ठेवून मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेतर्फे पुरुषांनी वटपौर्णिमा साजरी केली. स्त्रीसमानता प्रत्यक्ष कृतीतून दिसली पाहिजे व त्या भावनेने पुरुषही स्रियांसोबत आहेत हा आगळ्या वेगळ्या पूजना मागील उद्देश असल्याचे संघटनेचे अण्णा जोगदंड यांनी या वेळी सांगितले.
४० पुरुषांनी वडाच्या झाडाला सूत बांधून प्रदक्षिणा मारल्या व पत्नीबद्दल कृतघ्नता व्यक्त केली. वटसावित्रीचे खरे पूजन केल्याचे समाधान मिळाल्याचे सांगितले. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, शहर उपाध्यक्ष विकास शहाणे, आरोग्य निरीक्षक संजय मानमोडे आदींनी सहभाग घेतला.