पिंपरी : पिंपरी-चिंचवड हे गुणी माणसांचे शहर आहे. सांप्रदायिक विचारांची माणसे येथे आहेत. संत ज्ञानेश्वरमहाराजांची आळंदी आणि संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांची देहू असा भक्तीचा वारसा या शहरास आहे. भक्ती आणि शक्तीचे अनोखे स्मारक निगडीत उभारले आहे. सेवाभाव, सेवावृत्ती येथे अधिक प्रमाणावर दिसून येते. सद्गुणांचे कौतुक करायला हवे, असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात व्यक्त केले.महापालिका उद्यान विभाग आणि भंडारा डोंगर दशमी समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, रजनीताई पाटील, उज्जैनचे जिल्हाधिकारी संकेत भोंडवे, माजी आमदार विलास लांडे, भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, विजय बोत्रे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तानाजी शिंदे, उद्यान विभागाचे अधीक्षक सुरेश साळुंखे, माजी महापौर मंगला कदम, मोहिनी लांडे, शंकरमहाराज शेवाळे, श्रीक्षेत्र पंढरपूर देवस्थानाचे विश्वस्त शिवाजीमहाराज मोरे, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सुमन पवळे उपस्थित होते. जोपा पवार यांचा गौरव राज्यपाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.काशीद म्हणाले, ‘‘नि:स्पृह भावनेने काम करणाऱ्या व्यक्तीचा गौरव करण्यात आला. आजच्या जगात सेवाभाव जपण्याची गरज आहे.’’लांडे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवडच्या विकासात श्रीनिवास पाटील यांचे योगदान मोलाचे आहे. सेवावृत्तीने काम करणाºया व्यक्तीचा सत्कार, गौरव झाला. हा सद्गुणांचा गौरव आहे.’’ संदीप साकोरे यांनी सूत्रसंचालन केले.उद्योगनगरीत आपुलकी आणि जिव्हाळाराज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘‘वारकरी संप्रदायाचा स्थायिभाव सेवा हा आहे. पिंपरी-चिंचवडचा विकास मोठ्या वेगात झाला आहे. गावांचे शहरीकरण होत असताना सकाळी दूधविक्री, दिवसभर श्रम करून सायंकाळी भजन-कीर्तन या परिसरातील माणसे करीत असत. आपुलकी आणि जिव्हाळा होता. त्या काळचे पालिकेतील कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी सेवाभाव वृत्तीने काम करीत होते. आपल्या गाडीने अधिकारी आणि लोकप्रतिनिधी महापालिकेत येत असत. घरून आणलेले जेवण करीत असत. संस्कार आणि सेवाभाव टिकून आहे. सेवाभाव वृत्ती आणि माणूसपण जपणारी माणसे या परिसरात काम करताना मिळाली. त्यामुळेच विकासात योगदान देऊ शकलो. समाजातील चांगुलपणाचे कौतुक करायला हवे. सेवाभाव, सेवा वृत्ती वाढवायला हवी. सद्गुणांचे कौतुक करायला हवे.’’
सद्गुणांचे कौतुक करायला हवे- श्रीनिवास पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 3:23 AM