पुणे : अहमदनगर,पुणे आणि सातारा भागातून एक, दोन नव्हे तर तब्बल दीडशे गाड्या चोरून भंगारात विकणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. राजू जावळकर आणि सोमनाथ चौधरी अशी या आरोपींची नावे असून यातून मिळणाऱ्या पैशाचा वापर त्यांनी प्रपंच चालवण्यासाठी केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
यापैकी जावळकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जवळपास १५० गुन्हे दाखल आहेत.काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आला होता. त्याचा साथीदार असलेल्या चौधरीवर २५ गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राहटणी येथून एक चारचाकी गाडी चोरली होती. त्याचा तपास वाकड पोलीस करत होते. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक हरीश माने मिळालेल्या खबरीनुसार चोरलेली चारचाकी खेड शिवापूर परिसरात आहे. त्याप्रमाणे घटनास्थळी गेले असता पोलिसांना दोन्ही आरोपी गाडी कापताना आढळून आले. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केली असता सात गुन्हे उघड झाले आहेत.
या विषयावर माहिती घेतली असता जावळकरला दोन मुले असून ते नेवासा येथील बोर्डिंगमध्ये शिक्षण घेत असल्याचे समजते. त्यासाठी तो प्रतिवर्षी मोठया रकमेची फी भरतो. राजू हा गेली २० वर्ष वाहनचोरीचे गुन्हे करत आहे. चोरलेली चार चाकी चोरुन ती भंगारात विकायचा आणि या पैशांमधून तो संसार आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवतो. या चोऱ्या करताना त्यांनी तंत्रज्ञानाचीही खबरदारी घेतली असून चोरलेल्या गाडीला जीपीएस सिस्टम आहे का हे बघण्यासाठी ते गाडी काही दिवस अज्ञात स्थळी ठेवायचे. तिथे दोन दिवस पोलीस किंवा गाडी मालक तर येत नाही ना याची खातरजमा करूनच गाडीचे भाग भंगारमध्ये विकले जायचे.