हिंजवडी : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी होत असून हे मतदान शांततेत आणि सुरळीतपणे पार पडावे याकरीता शहरातील पोलीसदल सक्षम आणि सतर्क आहे, हा संदेश देण्यासाठी वाकड पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला.
शनिवारी सायंकाळी ५ ते ७ यावेळेत वाकड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह राज्य राखीव पोलीस दलाचे जवान यांनी दुचाकी रॅली काढली. सहाय्यक पोलीस आयुक्त आश्विनी राख यांच्या नेतृत्वाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने यांच्यासह १० अधिकारी व १५० पोलीस कर्मचारी ७५ दुचाकी सह रूटमार्च मधे सहभागी झाले होते. वाकड पोलीस ठाण्यापासून सुरुवात करून स्वामी विवेकानंद नगर, काळाखडक, पंडीत पेट्रोलपंप मार्गे डांगेचौक नंतर थेरगाव फाटा, गावठाण, पडवळनगर ते पाचपीर चौक, रहाटणी फाटा, काळेवाडी फाटा, वेणूनगर मार्गे वाकड पोलीस ठाणे येथे समारोप करण्यात आला.